गर्डर टाकण्यासाठी डोंबिवलीत पाच दिवस वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:42+5:302021-04-30T04:50:42+5:30
डोंबिवली : येथील पूर्वेकडील राजाजी पथ येथे सुरू असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकपासून ते डोंबिवली पूर्वेकडील ...
डोंबिवली : येथील पूर्वेकडील राजाजी पथ येथे सुरू असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकपासून ते डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील गर्डर चढविण्यात येणार आहेत. हे काम रविवारी रात्री १२ पासून ते ७ मे रात्री १२ पर्यंत करण्यात येणार असल्याने या कालावधीत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
रामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रामनगर रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने ही एस.व्ही. रोडवरून वृंदावन हॉटेल मार्गे उजवीकडे वळून बिर्याणी कॉर्नर येथून डावीकडे वळून पुढे एस. के. पाटील चौकमार्गे उजवीकडे वळून राजाजी पथ गल्ली क्रमांक १ मार्गे इच्छित स्थळी जातील. आयरे गाव, आयरे रोड डोंबिवली पूर्वेकडील परिसरातून राजाजी पथ मार्गे रेल्वेस्थानक रामनगरकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना राजाजी पथ गल्ली क्रमांक १ च्या कडेला प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने राजाजी पथ गल्ली क्र १ मधून एस.के. पाटील चौकातून इच्छितस्थळी जातील, अशी अधिसूचना डोंबिवली वाहतूक शाखेने जाहीर केली आहे.
............
मनाई असताना मासळी विक्री
डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार सकाळी ११ नंतर दुकानदार, फेरीवाले आणि मच्छी विक्रेत्यांना विक्री करण्यास मज्जाव असतानादेखील मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. मासळीच्या पाट्या जमा करून स्टॉल तोडून टाकण्यात आले. ही कारवाई पश्चिमेकडील उमेशनगर आणि रेल्वे स्टेशन रोड परिसरात करण्यात आली. ह प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांच्या आदेशाने अतिक्रमण पथकाचे प्रमुख विजय भोईर यांच्यावतीने ही कारवाई केली. दिनदयाळ रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.
----------------------------------------
कोरोना : नऊ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी एक हजार ९१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एक हजार ४७० रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे. गेल्या २४ तासांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला १३ हजार ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख १९ हजार ७० रुग्ण आढळून आले आहेत. तर एक हजार ४११ रुग्णांचा मृत्यू झाला असून एक लाख चार हजार २०४ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------------------------
-----------------------------------------------