साथीचे रोग! पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण, सोनोग्राफी सेंटरवर वाढला ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 06:56 PM2019-08-26T18:56:04+5:302019-08-26T18:56:15+5:30
ठाणे शहरात डेंग्यू, मलेरीया आदींच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
ठाणे - शहरात साथीच्या रोगांची साथ सुरू असतानाच आता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील तब्बल पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व डॉक्टर सोनोग्राफी विभागात कार्यरत असून आता या पाचही डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. मात्र, त्यामुळे सोनोग्राफी विभागावरील ताण वाढला असून दिवसाला केवळ 100 च्या आसपासच सोनोग्राफी केली जात असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे.
ठाणे शहरातडेंग्यू, मलेरीया आदींच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु यावर उपाय योजना करण्यात पालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग कुठेतरी कमी पडत असल्याचेच दिसत आहे. एकीकडे सर्वसामान्य ठाणोकरांना डेंग्युने सतावले असतांनाच आता पालिकेचेच डॉक्टर डेंग्युच्या विळख्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डेंग्युने पाच डॉक्टर फणफणले असून त्यांच्यावर आता याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्क्रीनंगमध्ये या पाचही डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, याचा परिणाम मात्र सोनोग्राफी विभागावर झाल्याचे दिसून आले आहे. सोनोग्राफी विभागात सात डॉक्टर कार्यरत होते. त्यातील पाच डॉक्टरांवरच आता उपचार सुरू असल्याने त्याचा परिणाम सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. कळवा रुग्णालयात दिवसाला रोज 200 ते 250 सोनोग्राफी होत होत्या. परंतु आता या विभागात दोनच डॉक्टर असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला असून त्यांच्याकडून केवळ दिवसाला 100 च्या आसपासच सोनोग्राफी होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. परंतु रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याने तशा प्रकारचे प्रशिक्षण असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच आता रुग्णांचेही या निमित्ताने हाल सुरु झाले आहे.
दरम्यान मागील दिड वर्षापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे कळवा रुग्णालयातील डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. तसेच एका डॉक्टराचा मृत्युही झाला होता. परंतु, आता पुन्हा अशा प्रकारे पाच डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग या निमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला आहे. सोनोग्राफी सेंटर आणि आजूबाजूच्या परिसरात तीन दिवसात दोन वेळा फवारणी करण्यात आली आहे. तसेच इतर उपाय योजना करण्यात आल्याची माहिती ठाणो महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरदास गुजर यांनी दिली.