धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा, जनजीवन झाले विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:06 IST2021-09-23T13:05:00+5:302021-09-23T13:06:08+5:30
धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून प्रशासनाने सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा, जनजीवन झाले विस्कळीत
कासा : डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून गेल्या दोन दिवसात कासा परिसरात पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. परिसरातील नदी-नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून बुधवारी सकाळी धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.
धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून प्रशासनाने सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या मोठ्या पावसामुळे चारोटी गुलझारी नदीला पूर आला असून चारोटी येथील पुलावरून पाणी जात असल्याने डहाणू- कासा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
कासा पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावले आहेत. या गुलझारी नदीकिनारी चारोटी नाक्यावर असलेल्या दुकानात पाणी शिरले असून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या सततच्या पावसाने गंजाड, रानशेत, चारोटी, कासा रस्त्यावर पाणी शिरून वाहतूककोंडी होत आहे.
पेठ, म्हसाड पूल पाण्याखाली गेल्याने येथील गावांचा संपर्क तुटला आहे तसेच सारणी उर्से अनेक नाले पुरामुळे पाण्याखाली गेल्याने सारणी, आंबिवली, निकावली, म्हसाड, उर्से साये, अंबिस्ते आदी गावांचा संपर्क तुटला होता.