डोंबिवली-मुंबई प्रवासाला पाच तास, ठाण्यात टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:44 PM2020-06-08T23:44:14+5:302020-06-08T23:45:39+5:30

अपुऱ्या बससेवेमुळे दिव्यात हाल : ठाण्यात टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी

Five hours journey from Dombivali to Mumbai | डोंबिवली-मुंबई प्रवासाला पाच तास, ठाण्यात टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी

डोंबिवली-मुंबई प्रवासाला पाच तास, ठाण्यात टोलनाक्यावर प्रचंड वाहतूककोंडी

googlenewsNext

जितेंद्र कालेकर/अनिकेत घमंडी ।

ठाणे/डोंबिवली : लॉकडाऊनचे पाच टप्पे पूर्ण केल्यावर सोमवारपासून खासगी कार्यालयांसह अनेक व्यवहार सुरळीत करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न उपनगरीय लोकलसेवेखेरीज किती तोकडे आहेत, याचा प्रत्यय उपनगरांत राहणाºया नोकरदार, व्यावसायिक यांना प्रकर्षाने आला. डोंबिवली अथवा विरारहून बसने मुंबईतील कार्यालय गाठण्यासाठी पाच तास लागत होते. ठाण्यातून मोटारीने मुंबई गाठणाऱ्यांचीही अशीच तीन तास रखडपट्टी झाली. लोकल सेवा बंद असल्याने आणि ती पुढे किती काळ बंद राहील, याची शाश्वती नसल्याने असा कष्टप्रद प्रवास आणखी किती काळ करावा लागणार, या कल्पनेनी कर्मचाºयांच्या अंगावर काटा उभा राहिला.

खासगी कार्यालयांमध्ये सोमवारपासून १० टक्के कमचाºयांच्या उपस्थिती बंधनकारक केली होती. परिणामी कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांना मोठा द्रविडी प्राणायम करावा लागला. मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेली लोकल सुरू न झाल्यामुळे अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली. खासगी वाहनाने मुंबई गाठणे हे रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून तिकीट काढून प्रवास करण्यापेक्षा पाचपट महाग असूनही अनेकांनी पहिल्या दिवशी उत्साहाने मोटारी रस्त्यावर आणल्या. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास ठाण्याच्या वेशीवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ असलेले ठाणे, डोंबिवली, कल्याणचे रहिवासी सोमवारपासून कार्यालयाकडे निघाले. परंतु, मुंबईतील कार्यालय गाठण्याकरिता किती यातना भोगाव्या लागणार आहेत, याचा विदारक अनुभव त्यांना पहिल्याच दिवशी आला. ठाणे येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंद नगर टोलनाका परिसरात मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.
रुग्णालये, पाणीपुरवठा विभाग, पोलीस, अग्निशमन दल, सुरक्षारक्षक आणि प्रसारमाध्यमे या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथे वास्तव्याला आहेत. यातील काही कर्मचारी कोरोनाच्या काळातही असाच खडतर बस प्रवास करून आपापली कार्यालये गाठत आहे. सोमवारी त्यामध्ये अन्य खासगी कर्मचारी, कामगार यांची भर पडल्याने ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावर सकाळी ७ ते १० दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दिव्यातूनही मुंबईला कामावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. डोंबिवलीकरांच्या तुलनेत दिव्यातील प्रवाशांसाठी फारच मामुली बससेवा उपलब्ध केल्याने दिवावासीयांचे आणखी हाल झाले. तेथे बससाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा होत्या. काही प्रवाशांना तर दोन ते अडीच तास प्रतीक्षा करूनही बस न मिळाल्याने कार्यालयाची वेळ टळून गेल्याने पुन्हा घरी परतावे लागले. पहिल्या दिवशी गोंधळ झाल्याने कामावर गेलो नाही तरी उद्यापासून कोणत्याही परिस्थितीत कामावर हजेरी लावावी लागेल. अगोदरच वेतन कपात लागू झाली आहे. कामावर दांडी मारली तर नोकरी गमावण्याचा धोका आहे, अशी तक्रार दिव्यातील नोकरदारांनी केली.

‘पावसात आणखी हाल होतील’
ठाणे, दिवा येथील जे कर्मचारी सकाळी साडेतीन ते चार तास प्रवास करून मुंबईत गेले, त्यांचे सायंकाळी घरी परत येतानाही तसेच हाल झाले. अपुºया बससेवेमुळे त्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झाला. दररोज सहा-सात तास प्रवासात घालवायचे आणि कार्यालयात आठ तास काम करायचे, हे अशक्य आहे. अजून मुसळधार पाऊस सुरू झालेला नाही. त्यावेळी तर आणखी हाल होतील, अशी तक्रार एका महिला कर्मचाºयाने केली.

टीएमटीच्या १०० बस रस्त्यावर
मुंबईतील बेस्टच्या फेºयांची संख्या वाढविण्यात न आल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. आगामी काळात एसटी आणि सार्वजनिक उपक्रमातील बसफेºयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी अनेक कर्मचाºयांनी केली. दरम्यान, ठाणे परिवहन सेवेच्या ४० टक्के म्हणजे १०० बसगाड्या या सोमवारी रस्त्यावर होत्या. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच ही सेवा सध्या सुरू आहे, अशी माहिती ठाणे परिवहन सेवेच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

मीरा-भार्इंदरला बेस्टसाठी रांगा
मीरा रोड : प्रवाशांसाठी बेस्ट बस सोमवारपासून सुरू झाल्याने भार्इंदर व मीरा रोडमध्ये बससाठी प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. बहुतांश मीरा-भार्इंदरचे नागरिक कामानिमित्त मुंबईला येजा करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकल सर्वात सोयीची असते. लोकलनंतर सर्वात जास्त भिस्त बेस्ट बस वर असते. त्यामुळे बेस्ट बस सुरू होताच लोकांनी गर्दी केली. भार्इंदर पूर्वेला बससाठी बंदरवाडी स्टॉपपासून स्टेशन मार्ग व पुढे थेट बाळाराम पाटील मार्गापर्यंत रांग लागली होती. मीरा रोडमध्येही गर्दी झाली होती. लोकल नसली तरी बेस्ट बस सुरू झाल्याने लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास मोठा आधार मिळाला आहे. भार्इंदर पूर्वेला लोकांनी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून आले. बसमध्येही सीटवर एकच प्रवासी बसवला जात होते.

कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूककोंडी
डोंबिवली : लोकल बंद असल्याने रस्ते मार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबईत नोकरीला जाणाºया कल्याण-डोंबिवली व त्यापुढील परिसरातील नोकरदार वर्गाला सोमवारी सकाळी कल्याण-शीळ महामार्गावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावल्याने या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी, वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले.

कल्याणहून शीळकडे जाणाºया मार्गात एका भागात काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट झाले आहे. त्यामुळे वाहन नेमके कोणत्या मार्गिकेतून न्यावे, असा प्रश्न पडला. त्यामुळेही वेगाला ब्रेक लागला. तीन महिन्यांनी वाहनांची गर्दी झाल्याने सगळा गोंधळ दिसून आला होता. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने त्यातून मार्ग काढताना काही वेळ लागत होता. त्यानंतर कुर्ला, घाटकोपर भागांतही कोंडी झाली होती.

त्यामुळे पहिल्याच दिवशी कामावर जाताना आधी बस मिळवण्यासाठी व त्यानंतर कोंडीतून वाट काढत कार्यालय गाठण्यासाठी व पुन्हा घरी परतण्यासाठी चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागली. प्रवासातच वेळ जास्त गेल्याने नोकरदार त्रस्त झाले होते. दरम्यान, घरडा सर्कल येथे केलेले डांबरीकरण व त्यातच पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या.

Web Title: Five hours journey from Dombivali to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.