सोनसाखळी चोरणारे पाच इराणी जेरबंद, दोन महिलांचाही समावेश : चोरीच्या मोटारसायकल, मोबाइलही हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:55 AM2017-10-13T01:55:11+5:302017-10-13T01:55:28+5:30
सोनसाखळी आणि मोटारसायकल चोरीप्रकरणी पाच इराणींना अटक करण्यात पोलिसांच्या चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींमध्ये दोन महिला आहेत.
कल्याण : सोनसाखळी आणि मोटारसायकल चोरीप्रकरणी पाच इराणींना अटक करण्यात पोलिसांच्या चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींमध्ये दोन महिला आहेत. सोनसाखळी चोरीचे १०, तर मोटारसायकलचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोबाइल व चार लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशा आरोपींना जेरबंद करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. मात्र, या गुन्ह्यातील पाच आरोपींना चोरीप्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. आरोपींमधील कासीम मुक्तार इराणी व हुसेनी ऊर्फ गझनी मुक्तार इराणी या सराईत सोनसाखळी चोरांना पिंपरी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांचा ताबा घेऊन चौकशी केली असता फातिमा इराणी हिचे नाव समोर आले. फातिमा ही तिच्या मुलाला व त्याच्या मित्रांना चोरीच्या गुन्ह्यात मिळालेला मुद्देमाल विकण्यासाठी मदत करत. फातिमाबरोबर तिच्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या सहकाºयांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख ३९ हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर या गुन्ह्यातील तपासात मुस्तफा ऊर्फ मुस्सू संजय सय्यद यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३७ हजारांचे दागिने व दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याने चोरलेले दागिने फराह हाफिज खान ही विकण्यास मदत करायची. तिलाही पोलिसांनी जेरबंद केले असून सय्यदचा साथीदार अली हसन जाफरी-इराणी यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून लुटलेले ४५ हजारांचे दागिने आणि चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.
दरम्यान, चोरीप्रतिबंधक पथकाचे निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश पाळदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
विविध ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद : आरोपींनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत सोनसाखळी चोरीचे १० आणि मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
उघडकीस आलेल्या सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमध्ये कोळसेवाडी तीन, मानपाडा, खडकपाडा, रामनगर प्रत्येकी दोन आणि टिळकनगरमधील एका गुन्ह्याचा समावेश आहे.
मोटारसायकलचोरीच्या गुन्ह्यामध्ये कोळसेवाडी, खडकपाडा, महात्मा फुले चौक यासह ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.