पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धेला पाच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:16 AM2020-10-16T00:16:40+5:302020-10-16T00:19:09+5:30
पोलीस असल्याची बतावणी करीत एका ६०उ वर्षीय वृद्धेला एका त्रिकुटाने पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पोलीस असल्याची बतावणी करीत एका ६० वर्षीय वृद्धेला एका त्रिकुटाने पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तीन भामटयांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कळव्यातील पारसिकनगर भागात राहणारी ही महिला १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भगवान शंकर मंदिरात दिवा लावून परत घरी जात होती. अमृतआंगण सोसायटीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरुन ती जात असतांना ३५ ते ४० वयोगटातील तीन भामटयांनी तिला गाठले. आपण पोलीस असल्याची तिला त्यांनी बतावणी केली. नंतर तिच्याकडील दहा तोळे वजनाचे चार लाखांचे सोन्याचे दागिने, एक लाख २० हजारांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मणी असा पाच लाख २० हजारांचा ऐवज बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून लंपास केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रुती शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.