‘... तर पाच लाख लोकांचे संसार रस्त्यावर’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:28 AM2022-01-21T10:28:06+5:302022-01-21T10:29:32+5:30
न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय आला असल्याचे सांगून रेल्वेने कळवा-कल्याणमधील रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटिसा दिल्या आहेत.
ठाणे : रेल्वे रुळालगतच्या सर्व झोपड्या हटविण्याच्या रेल्वेच्या निर्णयाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोध केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय आला असल्याचे सांगून रेल्वेने कळवा-कल्याणमधील रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटिसा दिल्या आहेत. जर सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटवावी लागली तर मुंबईतील पाच लाख लोकांचे संसार उघड्यावर येतील. ठाण्यात हजारो संसार रस्त्यावर येतील. कळव्यात जेव्हा असाच निर्णय आला होता त्यावेळी आम्ही रेल्वे रोखून सरकारला हा निर्णय फिरवायला भाग पाडले होते. एकाही माणसाला घराच्या बाहेर पडू देणार नाही. त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर हिरावणाऱ्या समोर मी छातीचा कोट करून उभा राहीन.