सणासुदीत राज्याच्या आरोग्यातील गटप्रवर्तक-आशांचे रखडलेले पाच महिन्यांचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 02:59 PM2021-09-12T14:59:42+5:302021-09-12T15:00:02+5:30
काम बंदचा इशारा
ठाणे: राज्यात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका मार्च २०२० पासून आरोग्य कर्मचारी सोबत कोरोनाची कामे करत आहेत. तुटपुंज्या मानधनावर काम करत असतांनाही त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याचा आरोप होत आहे. सध्या ही पाच महिन्यांचे मानधन रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. सध्याचा ऐन सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊनही मानधन दिले नाही.आठ दिवसाच्या आत मानधन, कोरोना भत्ता, इतर देय मिळालेच पाहिजे, अन्यथा कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या या गटप्रवर्तक व अशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळात स्वतःचा, मुलाबाळांचा, कुटुंबांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांची मुले शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, मुलांना शैक्षणिक साहीत्य खरेदीसाठी आदी आर्थिक समस्या भेडसावत आहे. काम करूनही शासन प्रशासन पैसे देत नाही त्यामुळे त्यांच्यात सरकार बद्दल असंतोष खदखदत आहे, असे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशास्वयंसेविका संघाचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी सांगितले.
आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यासाठी राज्यातील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांनी जूनमध्ये संपही केला होता. दरम्यान सरकारने गटप्रवर्तकांना एक हजार २०० व कोरोना भत्ता ५०० असे एक हजार ७०० रूपये गटप्रवर्तकांना घोषीत झाले आहे. आशा स्वयंसेविकांना एक हजार रू व कोरोना भत्ता ५०० रुपये आदी एक हजार ५०० रुपये वाढ झाली आहे. यास राज्यमंत्री मंडळाने मान्यताही दिली आहे. मात्र शासन आदेश आजपर्यंन्त काढला नाही. तो ताबडतोब काढण्यात यावा व राज्य सरकारने मागिल मानधनवाढीची राहिलेली पाच महिन्याची थकबाकी व जुलैपासूनचा फरक ताबडतोब देण्यात यावा. केंन्द्र सरकारचा बंद केलेला प्रोहत्सान भत्ता सुरू करावा आदी मागण्यां केल्या जात आहेत.