तिघा नायजेरीनसह पाचजणांना अटक
By admin | Published: August 29, 2015 11:11 PM2015-08-29T23:11:13+5:302015-08-29T23:11:13+5:30
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भारतामध्ये भागीदारीत व्यवसाय करायचे सांगून हैदराबादमधील मित्रांना लाखोंचा चुना लावणाऱ्या तिघा नायजेरीनसह पाच जणांना ठाणे पोलिसांनी अटक
ठाणे : सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भारतामध्ये भागीदारीत व्यवसाय करायचे सांगून हैदराबादमधील मित्रांना लाखोंचा चुना लावणाऱ्या तिघा नायजेरीनसह पाच जणांना ठाणे पोलिसांनी अटक करून त्यांना हैदराबाद पोलिसांच्या हवाली केले. यासाठी हैदराबादचे पथक शनिवारी ठाण्यात आले होते.
नायजेरीन टेरी ओनएम जोसेफ याने सुमारे १० महिन्यांपूर्वी फेसबुकवर हैदराबादमधील टी.प्रविणकुमार यांची ओळख झाली. याचदरम्यान, त्याने प्रविणकुमारला भारतामध्ये व्यवसाय करावयाचा असून हिरे आणि सोन्याची बिस्किटे पाठवतो असे सांगून ते कस्टममधून सोडवण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने ११ लाख रुपये भरले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने हैदराबादमध्ये आत्महत्या केली.
याचदरम्यान जोसेफने त्याचा मित्र एन. आर. सदाशिवा याच्याशी संपर्क साधून त्याची देखील पावणे चार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सदाशिवाने हैदराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचदरम्यान, जोसेफच्या सांगण्यावरून सदाशिवाने डोंबिवलीतील एका बँकेत ५० हजार रुपये भरल्याचे समोर आल्यावर त्यांनी ठाणे पोलिसांना शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांच्या पथकाने खातेदार लक्ष्मण माळीला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून महेश रजपूत उर्फ राजेश गुप्ता तसेच नायजेरीन फ्रॅक, व्हॅलनटाईन आणि केव्हीन यांना अटक केली. त्यांना ठाण्यात आलेल्या हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात शनिवारी दिले.
(प्रतिनिधी)
पोलिसांचे आवाहन
गुप्ताने बॅकेचे कर्ज मिळून देतो अशी जाहिरात दिली होती. त्यानुसार गरीब घरातील माळीने त्याच्याशी संपर्क केला होता. मात्र, खात्यावर पैसे देवाण-घेवाणीत मोठी रक्कम दिसत नसल्याने कर्ज देता येत नाही असे त्यांना सांगितले. तरी पण कर्ज मिळवून देतो. त्यानुसार, तो त्याने जाहिरातीस भुललेल्या नागरिकांकडून रक्कम जमा करण्यासाठी माळीच्या खात्याचा वापर सुरू केला. त्याबदल्यात माळीला दोन टक्के रक्कम देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.