जादा व्याजाचे पैसे देण्याचे आमिष : एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:59 PM2019-04-04T21:59:01+5:302019-04-04T22:13:42+5:30
? जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) याच्यासह पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांची दहा वेगवेगळी बँक खातीही सील केल्याचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
ठाणे : अल्पावधीत जादा व्याजाचे आमिष दाखवून नऊ जणांची एक कोटी ४० लाखांची फसवणूक करणाºया प्रकाश मोरे (५२, रा. खडकपाडा, कल्याण) याच्यासह पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी गुरुवारी दिली. मोरे याच्या उर्वरित साथीदारांना दिल्ली आणि गुजरात येथून अटक केली असून त्यांची वेगवेगळी १० बँक खाती सील करण्यात आली आहे.
रेडरॉकगेम, टिप्सझोन अॅडवायजरी प्रा.लि., क्रिप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जिआ कुल आदी बनावट कंपन्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून ठाण्यातील एका रहिवाशाला ११ लाख ५० हजारांची गुंतवूणक करण्यास ठाण्याच्या वाघबीळ येथील संदीप पाटील (४२) याने भाग पाडले. एका योजनेनुसार सात लाख ५० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना गुंतवणुकीतील रकमेच्या एक टक्का रक्कम दिवसाला फायदा म्हणून २०० दिवस दिले जातील, असा दावा करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांना २०० दिवसांमध्ये २१ लाख रुपये कंपनीकडून देण्यात येणार होते. त्यांनी आणखी असेच गुंतवणूकदार कंपनीला मिळवून दिले, तर त्या गुंतवणूकदारांच्या रकमेच्या तीन टक्के रक्कम त्यांना रॉयल्टी म्हणून २०० दिवसांपर्यंत दिली जाणार होती. आपल्याला मोठा व्याजाचा परतावा मिळणार, या आशेपोटी त्यांनी ११ लाख ५० हजारांच्या रकमेची गुंतवणूक केली. हा प्रकार १२ एप्रिल २०१८ ते २२ फेब्रुवारी २०१९ या काळात घडला. याच काळात त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना त्यांचे पैसेही परत मिळाले नाही. शिवाय, त्यांना भेटण्यासही संदीप पाटील आणि त्याच्या साथीदारांनी टाळाटाळ केली. या गुंतवणूकदारासह नऊ जणांची एक कोटी ४० लाख २७ हजार ५०० रुपयांची या कंपन्यांमधील भामट्यांनी फसवणूक केल्याचे आढळले. याप्रकरणी २९ मार्च २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांच्या पथकाने मुख्य आरोपी टीप्स झोन अॅडव्हायजरी प्रा.लि. या कंपनीचा संचालक प्रकाश मोरे याला कल्याण येथून अटक केली. त्याच्याच चौकशीतून पाटील याला १ एप्रिल रोजी अटक केली. त्यापाठोपाठ गुजरात येथील ज्याच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले तो उमंग शाह (२७, रा. सुरत, गुजरात) आणि अजय जरीवाला (४३, रा. सुरत, गुजरात) या दोघांना गुजरात येथून ३ एप्रिल रोजी अटक केली. दिल्ली येथून रितेश पटेल (३५, रा. बलसाड, गुजरात) याला ४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. यातील प्रकाश आणि संदीप या दोघांना ८ एप्रिलपर्यंत तर उमंग, अजय आणि रितेश तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक महेंद्र भामरे, उपनिरीक्षक एस.आर. गावंड, डी.बी. सरक आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेली १० खाती आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
जादा व्याजाचे आमिष दाखवून बनावट कंपन्या गुंतवणूकदारांना फसवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोणत्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. संपूर्ण खातरजमा करूनच आपली रक्कम गुंतवावी.
संजय जाधव, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर
---------------------