भिवंडीतील पेपरफुटीत पाचजण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:35 AM2019-04-14T01:35:22+5:302019-04-14T01:35:31+5:30
दहावीच्या परीक्षेदरम्यान भिवंडीत विविध ठिकाणी व्हॉट्सअॅप ग्रुपवर सहा पेपर फुटले होते.
भिवंडी : दहावीच्या परीक्षेदरम्यान भिवंडीत विविध ठिकाणी व्हॉट्सअॅप ग्रुपवर सहा पेपर फुटले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. याशिवाय आपल्या पाल्यासाठी प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या एका वकील पालकासह दोन शिक्षक फरार आहेत.
पेपर फुटल्याप्रकरणी नारपोली व शहर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांनी शहरातील दोन्ही ट्रेझरी केंद्रांबाहेर साध्या वेशातील पोलीस उभे केले. तेव्हा कामतघर येथील काकतिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्य केंद्रप्रमुख तथा उपमुख्याध्यापक अंबर मलिक अफरोज अन्सारी याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधीसमोर त्याने गैरप्रकार केल्याची कबुली दिली. अंबर मलिक हा अॅड. समीर फौजी यांच्या मुलीची खाजगी शिकवणी घेत असल्याने तिला परीक्षेदरम्यान मदत व्हावी, या उद्देशाने टेÑझरीमधून मिळालेले दहावीच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते अंबर मलिक याने अॅड. समीर फौजी यांना पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अंबर मलिक यास अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
>सहा विषयांचे पेपर आरोपींनी फोडले
करिअर एज्युकेशन क्लासेसचा मालक शेख वजीर हफीझुर रेहमान याने त्याचा सहकारी शिक्षक नवीद अन्सारी यांच्या सहकार्याने शहरातील इस्लामपुरा येथील रफीउद्दीन फ की बॉइज हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्राचे प्रमुख साजीद खरबे यांच्याशी संपर्क साधला. साजीद खरबे यांच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवून त्या व्हॉट््सग्रुपवर पुरवल्या. ११ मार्च ते २० मार्चदरम्यान सहा पेपर फोडले आहेत. याप्रकरणी अॅड. समीर फौजी, शिक्षक साजीद खरबे व खाजगी कोचिंग क्लासचे मालक अजगर अली बारोड हे तीनजण फरार आहेत.