भिवंडीतील अल्पवयीन युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
By नितीन पंडित | Published: December 13, 2023 03:29 PM2023-12-13T15:29:45+5:302023-12-13T15:29:58+5:30
पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे उघड
भिवंडी: काल्हरे येथे खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी या पूर्वी दोन जणांना ताब्यात घेतल्या नंतर पोलिस पथकाने अनिकेत तुकाराम खरात,शिवाजी धनराज माने,संतोष सत्यनारायण ताटीपामुल या तिघा जणांना ताब्यात घेतल्याने अटक आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काल्हेर येथे राहणारा १६ वर्षांचा योगेश रवी शर्मा यास मोबाईल फोन करून काल्हेर खाडी किनारी बोलावून त्याची चाकू व कोयत्याने वार करून हत्या केली.त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील निर्जन स्थळी आगोदरच खड्डा खोदून ठेवलेल्या ठिकाणी योगेशचा मृतदेह पुरून ठेवला होता.
या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत,पोलीस निरीक्षक प्रमोद कुभार,पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,शरद पवार,पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार,पोलिस पथकातील निता पाटील, भरत नवले, सांबरे, पाटील,सहारे, जाधव,नांगरे,देसले यांनी कामतघर येथून आयुष झा व मनोज टोपे यांना तब्बल बारा दिवसांनंतर ताब्यात घेतले.त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी हत्येची कबुली देत मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवला होता ती जागा दाखवली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथे सहा महिन्या पूर्वी हत्या करणाऱ्या युवकांसोबत हत्या झालेल्या युवकाच्या गटाची हाणामारी झाली होती.या हाणामारीचा राग मनात ठेऊन पूर्ववैमनस्यातून हत्या करण्याचा कट रचून योगेश यास भांडण मिटविण्यासाठी बोलावून ही हत्या केली.
नारपोली पोलिसांनी दोन पथक बनवून राज्यात इतर ठिकाणी फरार झालेले अनिकेत तुकाराम खरात वय २३ वर्षे ,शिवाजी धनराज माने वय २३ वर्षे व संतोष सत्यनारायण ताटीपामुल वय १९ वर्षे या तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.या हत्येच्या गुन्ह्यात अजून काही आरोपी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.तर हत्या झालेला योगेश हा समाज माध्यमांवर उज्जैन येथील कुप्रसिद्ध दुर्लभ कश्यप याचा फॉलोअर असल्याचे समोर आल्याने त्यामधून प्रभावित होत तो काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांसोबत वावरत होता त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत असे शेवटी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले .