तीन पेट्रोलपंप मालकांसह पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:31 PM2017-09-13T22:31:46+5:302017-09-13T22:31:56+5:30
ठाणे, दि. 13 - पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्रही सुरू केले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणा-या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरनामक यंत्र असते. त्यामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणा-या पेट्रोल पंपांवर ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने डोंबिवलीत पहिली कारवाई 17 जून 2017 रोजी केली. त्यानंतर, राज्यभरात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकांमार्फत कारवाईचे सत्र सुरू केले. आतापर्यंत राज्यात टाकलेल्या 175 ठिकाणच्या छाप्यात 94 ठिकाणी मापात पाप असल्याची बाब पुढे आली होती. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली असून ते सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील 23 जणांविरोधात मुख्य आणि पुरवणी असे दोन दोषारोपपत्र काही दिवसांच्या अंतरावर न्यायालयात सादर केले आहे.
याप्रकरणी आता रडारवर असलेले पेट्रोलपंपांचे मालक आणि टेक्नीशिअन यांच्याविरोधात अटकसत्र केले आहे. सोमवारी रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे मालक जयदास तरे आणि टेक्नीशिअन विनोद अहिरे या दोघांना अटक केली. त्यानंतर, मंगळवारी कल्याण-शीळफाटा, काटईनाका येथील साई पेट्रोलपंपाचे मालक संजयकुमार यादव आणि बुधवारी हाजी मलंगगड येथील सद्गुरू पेट्रोपपंपाचे मालक बाळाराम गायकवाड व टेक्नीशिअन डबरूधर मोहंतो अशा तिघांना अटक केली. अहिरे आणि तरे यांना गुरुवारपर्यंत तर उर्वरित तिघांना शुक्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. अहिरे याने डोंबिवलीतील तर मोहंतो याने नागपुरातील पेट्रोलपंपांवरील यंत्रांमध्ये हेराफेरी केल्याचे समोर आले आहे.