जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:57 AM2020-12-13T00:57:20+5:302020-12-13T00:57:29+5:30

राज्यात आघाडी : प्रशासनाची माहिती

Five RTPCR centers in the district | जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

Next

n    लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रांसह एक नगरपालिका तर, ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची जिल्हा नियोजन निधीतून उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन निधीतून पाच आरटीपीसीआर केंद्रे उभारणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
मार्चच्या अखेरीपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. तेव्हापासून आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठीदेखील दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीतून आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यात आले. 
त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे चाचणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याच्या निदानासाठी जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका आणि ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ही केंद्रे व साहित्याच्या खरेदीसाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तसेच प्रत्येक केंद्रावर १० हजार आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) किटदेखील उपलब्ध करून दिले.

या ठिकाणी उभारली केंद्रे
भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांसह बदलापूर-अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक आणि ग्रामीण परिक्षेत्रातील पडघा येथे आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारले असून या ठिकाणी दिवसाकाठी २०० ते २५० चाचण्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सहा हजार ६०२ रुग्ण घेत आहेत उपचार
ठाणे जिल्ह्यात सात ते आठ महिन्यांत दोन लाख ३४ हजार ८७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन लाख २२ हजार ४८३ जण कोरोनामुक्त झाले. तर, पाच हजार ७९० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सध्या जिल्ह्यात सहा हजार ६०२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Web Title: Five RTPCR centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.