केडीएमसीच्या पाच शाळा बंद, पटसंख्येला लागली घरघर, चार शाळांचा निर्णय तूर्तास स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:04 AM2017-09-15T06:04:55+5:302017-09-15T06:05:12+5:30
केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
कल्याण : केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महिनाअखेरीस पुन्हा पटसंख्येचा आढावा घेतला जाणार असल्याने या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करत शाळा क्रमांक २३ नवापाडा (डोंबिवली पश्चिम), क्रमांक १४ काटेमानिवली, क्रमांक ६५ आनंदवाडी क्रमांक (दोन्ही कल्याण पूर्व), ८२ ब्राम्हण सभा परिसर, क्रमांक ८३ रामचंद्र टॉकिज (दोन्ही डोंबिवली पूर्व) अशा पाच शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना लगतच्या अन्य शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, शाळा क्रमांक ४२ गौरीपाडा, क्रमांक ४ रामबाग, क्रमांक ५४ मोहिली, क्रमांक ६ हनुमाननगर या चार शाळाही बंद करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले होते. परंतु, कल्याण पश्चिम भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन या शाळेची पटसंख्या चांगली असल्याकडे लक्ष वेधले होते. या शाळेत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले शिकतात. शाळा बंद झाल्यास त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल. तरीही शाळा बंद केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कल्याण या संघटनेचे पदाधिकारी निलेश वाबळे, नरेंद्र सोनजे आणि भगवान हमरे यांनीही नार्वेकर आणि शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांची भेट घेऊन संबंधित निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिका शाळांमध्ये सर्वसाधारणपणे गरीब विद्यार्थी शिकतात. शिक्षकांनी सर्वेक्षण करून हे विद्यार्थी गोळा केले आहेत. ऐन शालेय वर्ष सुरू असताना शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी योग्य नसल्याकडे संबंधित पदाधिकाºयांनी लक्ष वेधले होते. काही शाळांची पटसंख्या चांगली असताना त्या बंद करण्याचा निर्णय कसा काय घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची बैठक घेत शाळा बंद करण्याचा निर्णय कळविला. त्यावेळी त्यांनी नऊपैकी चार शाळांचा निर्णय स्थगित केला जात असल्याचेही स्पष्ट करत तेथील शिक्षकांना शाळेत रुजू होण्याच्या सूचना केल्या.
‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही’
पटसंख्या कमालीची घटल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यात तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. सध्या पाच शाळा बंद केल्या आहेत. उर्वरित चार शाळांचा आढावाअंती निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.