पडघ्यातील गोळीबारप्रकरणी पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:55 AM2018-11-11T05:55:03+5:302018-11-11T05:55:27+5:30
१४ जण फरार : भाजपा पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
भिवंडी : तालुक्यात खारपट्ट्यातील जमीनमालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीनच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध गावांत गोदामे बांधण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा विकास सुरू असताना आपले राजकीय व आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही नेत्यांमध्ये अहमहमिका लागली असून त्यामधून मागील महिन्यात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेने परिसरात गँगवार सुरू होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेतून आरोपींचा छडा लावत पाच जाणांना अटक केली. तर, १४ जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
२० आॅक्टोबरला पडघ्याजवळच्या आन्हे गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश ऊर्फ विजू गायकर यांच्यावर विरोधकांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा हल्ला २०० कोटींचा व्यवहार असलेल्या गोदाम विकासाच्या वादातून झाल्याचे तपासाअंती समोर आले. या घटनेच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी पुढे जाण्यास रस्ता न सापडल्याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळाले होते. त्यामुळे पोलिसांना हत्येचा कट रचणाºयांचा सुगावा लागण्यास मदत झाली. या घटनेतील मुख्य सूत्रधार व त्याचे तिघे साथीदार गुंड असून ते सातारा व पुणे भागातील प्रसिद्ध गँगस्टर आहेत. सोमनाथ चव्हाण (सोमाभाई), गौतम काशिनाथ शिंदे व हर्षद सुरेश येमकर (पुणे) अशी तिघांची नावे असून त्यापैकी गौतम व हर्षद या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे, तर सोमनाथ चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहे.
१३ नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
च्हल्लेखोर व शार्पशूटर्स फरार झाले होते, तर कट रचणारे विरोधक देवदर्शनासह पर्यटनासाठी पंजाब, जम्मू-काश्मीर येथे निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून गुरुवारी मुख्य सूत्रधार सचिन घोडविंदे, शूटर महेश ऊर्फ महाराज मधुकर चांदिलकर व विनायक सुरेश चव्हाण या तिघांना अटक केली.
च्शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर.ए. सावंत यांनी १३ नोव्हेंबरपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या कटातील १४ जण फरार असून पडघ्यातील दोन राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.