अवघ्या चार दिवसात पाच हजार ९३० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:38+5:302021-04-06T04:39:38+5:30
ठाणे : मागील महिनाभरापासून कोरोनाचा कहर ठाण्यात सुरूच आहे. आजघडीला दिवसाला दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ...
ठाणे : मागील महिनाभरापासून कोरोनाचा कहर ठाण्यात सुरूच आहे. आजघडीला दिवसाला दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मागील चार दिवसांत कोरोनाचे नवे पाच हजार ९३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबर ठाणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा पुन्हा ५० दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्यांवरून ८४ टक्यांच्या आसपास आले आहे. मागील काही दिवसांत मृत्यूदेखील वाढताना दिसत आहेत. एकूणच ठाण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मागील फेब्रुवारी मध्यापर्यंत कोरोना आटोक्यात असल्याचे दिसत होते. परंतु, फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने ठाणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यानुसार मार्चच्या एका महिन्यात शहरात १४ हजार ७४७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. परंतु, आता हा वेग पाच पटीने वाढल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत कोरोनाचे तब्बल पाच हजार ९३० नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ८३ हजार ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ७० हजार ६१८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर शहरात आतापर्यंत एक हजार ४६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६.४ टक्के एवढे होते. ते आता ८५ टक्क्यांवर आले आहे. सध्याच्या घडीला ११ हजार ८०३ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. मागील महिन्यात हेच प्रमाण एक हजार ७०० च्या आसपास होते. त्यातही आता वाढ होताना दिसत आहे.
- आठ हजार ९७९ रुग्ण हे घरीच विलगीकरणात
सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार घरातील एकाला बाधा झाली तर इतरांना बाधा होत आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे सध्याच्या घडीला एकूण प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आठ हजार ९७९ रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. तर दोन हजार ४८१ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील नऊ हजार ३६६ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तर एक हजार ९९२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. याशिवाय ४४५ रुग्ण हे क्रिटिकल असून ४४५ रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. तर ४४ जणांना व्हेंटिलेटर लावले आहे. दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा महिनाभरापूर्वी साधारणपणो ७ मार्च रोजी २५४ दिवसांवर होता. त्यानंतर तो १८३ दिवसांवर आला होता. आता हाच दर ५० दिवसांवर आला आहे.