दिव्यातील पाच हजार घरे दोन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:00 AM2018-07-06T04:00:23+5:302018-07-06T04:00:44+5:30
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवागावाला सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यात आता विजेच्या लपंडावाची भर पडली आहे. मागील दोन दिवसांपासून येथील साबेगावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे येथील सुमारे पाच हजार घरे अंधारात आहेत. दोन दिवस उलटून गेल्यानंतर महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दिवागावात मागील काही दिवसांपासून स्मशानभूमीचा मुद्दा चांगलाच गाजत होता. आता तो बाजूला जात नाही, तोच विजेच्या मुद्याने डोके वर काढले आहे. या भागातील साबेगावातील वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गाव संपूर्णपणे अंधारात आहे. याबाबत, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाºयांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही त्यावर महावितरणने योग्य तो तोडगा काढलेला नाही. केवळ या भागाचाच नाही, तर मागील आठवडाभरापासून साबेगावासह दातिवली, दिवा पश्चिम, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतही विजेचा लपंडाव सुरूआहे. कधी एक दिवस, तर कधी दोन दिवसांआड या भागातील वीज खंडित होत आहे.
लोकसंख्यावाढीमुळे ट्रान्सफॉर्मरवर लोड
या भागाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे विजेच्या ट्रान्सफॉर्मरवरील लोडसुद्धा वाढत आहे. परंतु, त्याची क्षमता वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच आम्हाला विजेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले. शिवाय, महावितरणच्या संबंधित अधिकाºयांकडे याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाइल बंद अवस्थेत असतो. सुरूअसला तरी योग्य प्रतिसाद मिळत नाही.
कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, त्याठिकाणीदेखील ते हजरच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे या भागात आकडे टाकणे, चोरून वीज वापरणे याचे प्रमाण अधिक असल्याने ट्रान्सफॉर्मर त्याचा लोड घेत नसल्याने वीजपुरवठा खंडित असल्याचे मत महावितरणने व्यक्त केले आहे.
वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्याविरोधात महावितरणला निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, शुक्रवारपर्यंत तो सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- निलेश पाटील, अध्यक्ष,
भाजपा, दिवा मंडल
दोन तासांत ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार असून सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. ए.आर. राठोड - महावितरण अधिकारी, दिवा-शीळ विभाग