ठाणेकरांसाठी पाच हजार किलोंचा द्राक्ष महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:07 AM2021-02-10T02:07:38+5:302021-02-10T02:07:46+5:30

सलग चार दिवस चालणार खरेदी

Five thousand kilos of grape festival for Thanekar | ठाणेकरांसाठी पाच हजार किलोंचा द्राक्ष महोत्सव

ठाणेकरांसाठी पाच हजार किलोंचा द्राक्ष महोत्सव

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात ११ फेब्रुवारी म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवस चार हजार ८०० किलो ताजे, गोड द्राक्षे महोत्सव शेतकऱ्यांद्वारे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठाणेकरांना सेंद्रिय पालेभाज्या, फळफळावळांची मोठी आवड आहे. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात सतत चार दिवस द्राक्ष महोत्सव चालणार आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी शासनाच्या रयत बाजार अभियानात इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींनी उत्पादित केलेल्या ताज्या व दर्जेदार पाच हजार किलो द्राक्षांचा महोत्सव ठाणेकरांसाठी ठाणे महानगरपालिका परिसरातील आठवडी बाजारात सुरू होत आहे. गुरुवारपासून सुरू होणारा हा महोत्सव प्रथम शिवाईनगर, ब्रह्मांड, जांभळी, कोलबाड, लोकमान्यनगर व वसंत विहारजवळील खेवरा सर्कल आदी परिसरात पार पडेल.
नाशिक येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याकडील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित होणाऱ्या द्राक्षांची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

चोखंदळ ठाणेकरांसाठी द्राक्षमहोत्सव
ठाणे : चोखंदळ ठाणेकरांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी या ठिकाणासह ठाणे मनपा मैदान, डवलेनगर टीएमटी बस डेपोमागे लोकमान्यनगर पाडा नं. ३, याशिवाय ब्रह्मांड ठामपा मैदान कोलशेत फेज नं. ५, पातलीपाडा लिंक रोड, ब्रह्मांड, उन्नती गार्डन मैदान, शिवाईनगर, पोखरण रोड नं. १, महानगरपालिका भाजी मंडई, एसआरए इमारतीच्या गेटमधील मोकळी जागा, खेवरा सर्कल, पोखरण रोड नं २, कोलबाड येथील जागमाता मंदिर आणि सृष्टी बिल्डिंगमधील रस्त्याची मोकळी जागा, ठामपा मैदान कोलबाड तलावाच्या जवळ आदी ठिकाणी हा द्राक्षेमहोत्सव पार पडणार आहे.

शेतकरी गटांकडून द्राक्षांची उपलब्धता
मल्हार ॲग्री फार्मर बोपेगाव, ता. दिंडोरी येथून रोज एक हजार किलो द्राक्षे उपलब्ध होणार आहेत. याप्रमाणेच पराशर कृषी विकास खेडगाव येथून 

५०० किलो, श्रीशक्ती महिला शेतकरी गट, खेडगाव तर ऋणानुबंध महिला स्वयंसहाय्यता, मातेरेवाडी, एकता शेतकरी बचतगट, बोपेगाव, कृषी लक्ष्मी आणि रुद्रादित्य फार्मर आदींकडून रोज २०० ते ५०० किलो द्राक्षांचा ताजा माल ठाणेकरांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

Web Title: Five thousand kilos of grape festival for Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.