उल्हासनगरमध्ये रोज पाच हजार प्रवाशांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:22+5:302021-07-19T04:25:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी ...

Five thousand passengers are registered in Ulhasnagar every day | उल्हासनगरमध्ये रोज पाच हजार प्रवाशांची नोंद

उल्हासनगरमध्ये रोज पाच हजार प्रवाशांची नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी असतानाही लोकलमध्ये गर्दी कशी होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उल्हासनगर स्थानकातून रोज ५ हजार ५००, तर महिन्याला ६५ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याची नोंद स्टेशन डायरीमध्ये आहे.

उल्हासनगर हद्द अंतर्गत शहाड, विठ्ठलवाडी व उल्हासनगर असे तीन रेल्वे स्टेशन असून, कोरोना महामारीपूर्वी तिन्ही स्टेशनमधून हजारो नागरिक ये-जा करीत असल्याची नोंद आहे. मात्र, कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून येण्याजाण्याची परवानगी सरकारने दिली. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकही लोकलमधून प्रवास करीत असल्याची चर्चा आहे. सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवशी लोकलमध्ये गर्दी असल्याने, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उल्हासनगर स्टेशनमधून महिन्याला ६५ हजार, तर दररोज सरासरी ५५०० नागरिक लोकलने प्रवास करीत असून, यापूर्वी हीच संख्या दरमहा अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक मनोहर पाटील यांनी दिली.

स्टेशनमध्ये लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडे जेव्हा तिकीट तपासणीस तिकिटाची विचारणा करतात तेव्हा अनेकांकडे तिकीट नसल्याचे उघड झाले. यातूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच स्टेशनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे उघड झाले, तर अनेकजण स्वतःची नोकरी वाचविण्यासाठी व लोकल व्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणार नसल्याने, रोज विनातिकीट प्रवास करीत आहेत. महिन्याला दोन-तीन वेळा तिकीट तपासणी दरम्यान पकडले जाण्याची भीती असते. मात्र, दुसरा याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विनातिकीट पकडल्यास २५० ते ७५० दरम्यान तिकिटांचा दंड भरावा लागतो, अशी माहिती चाकरमान्यांपैकी अनेकांनी दिली. मात्र, नाव उघड होईल, या भीतीपोटी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती त्यांनी केली, तर तिकीट तपासनीस यांनी कारवाई केलेली माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज दिली जात असून, याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्या असे सांगितले.

-------------------

हेतर आमच्यासाठी देवदूत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, मुंबईसह इतर ठिकाणी आजारी नातेवाईक व जवळील रुग्णाच्या मदतीला जावे लागते. त्यासाठी लोकल प्रवासाव्यतिरिक्त दुसरा प्रवास खर्च परवडणारा नसतो. अशावेळी संबंधित नातेवाईक व त्यांचे रुग्णालयाचे कागदपत्र दाखविल्यास लोकलचे तिकीट दिले जाते. त्यावेळी हेच खरे आमच्यासाठी देवदूत असतात, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

Web Title: Five thousand passengers are registered in Ulhasnagar every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.