वृक्ष पडून पाच वाहनांचे नुकसान, एका दुचाकीचा समावेश
By अजित मांडके | Published: July 1, 2024 04:23 PM2024-07-01T16:23:32+5:302024-07-01T16:23:57+5:30
सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झाली नसली तरी देखील वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.
ठाणे : ठाण्यात सोमवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वृक्ष उन्मळून पडल्याने पाच वाहनांचे नुकसान झाले. यात एका दुचाकीचा समावेश आहे. तर अन्य एका ठिकाणी वृक्षाची फांदी पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झाली नसली तरी देखील वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. तसेच महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांचा सिलसिला सुरुच आहे.
ढोकाळी येथील एकविरा आईच्या मंदिरा समोर श्रुती पार्कच्या आवारात पार्क केलेल्या तीन वाहनांवर वृक्ष पडल्याची घटना सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर येथील वृक्ष कापून बाजूला काढण्यात आला. यात घटनेत तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. दुसºया एका घटनेत कळवा, पारसिक नगर ९० फीट रोड परिसरात पार्क केलेल्या चारचाकी गाडीवर वृक्ष पडल्याची घटना दुपारी २.२७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतही कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वृक्ष बाजूला काढले. कोकणी पाडा उपवन या भागात एका दुचाकीवर वृक्षाची फांदी पडल्याची घटना घडली. या घटनेतही कोणालाही दुखापत झाली नसली तरी दुचाकीचे नुकसान झाले. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. चवथ्या घटनेत कोर्ट नाका परिसरात कोर्टाच्या बाहेर देखील वृक्षाची फांदी पडल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. वाहतुकीची वर्दळ या ठिकाणी असल्याने काही काळ या भागात वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले.