सार्वजनिक शौचालयाचे प्लास्टर पडल्याने पाच वर्षाची मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 09:25 PM2018-04-13T21:25:32+5:302018-04-13T21:25:32+5:30
भिवंडी : शहरात महानगरपालिकेने बांधलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या वाढत्या तक्रारी असताना पालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य-स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे असताना गेल्या महिन्यात दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या नांवाखाली घाईघाईने केलेले बांधकामाचे प्लास्टर पडून शाौचालयास गेलेली पाच वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात ठेकेदार,पालिकेचे अभियंतासह शौचालय चालका विरोधात तक्रार केल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.
शहरात शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथे सलाऊद्दीन हायस्कुल समोर पालिकेने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. या शौचालयांत काल गुरूवार रोजी मरीयमबानो सलीम शेख ही पाच वर्षाची मुलगी शौचास गेली होती.ती शौचालयांत असताना तीच्या डोक्यावर वरून नव्याने बांधकाम केलेले प्लास्टर पडले आणि तीच्या डोक्यास मार लागून ती जखमी झाली.या शौचालयाची नव्याने दुरूस्ती व सुशोभीकरणाचे काम गेल्या महिन्यात बांधकाम ठेकेदार रेहान अन्सारी याने केले आहे.मात्र ठेकादाराने निष्काळजीपणाने शौचालयाची दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम केल्याने महिनाभरांत हा अपघात झाला. त्याकडे पालिकेच्या विभागीय अभियंत्यांनी ढूंकूनही पाहिलेले नाही,असा आरोप परिसरांतील नागरिकांनी केला आहे.
हे शौचालय परिचालन करण्यासाठी आदर्श सामाजीक सेवा संस्थेला दिले असून शौचालय परिचालक संदिप जोगू यांनी शौचालयाच्या मागील महिन्यात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांची जीवीत व वैयक्तीक सुरक्षा धोक्यात आली आहे. त्या मुळे मरीयमबानो हिच्या दुखापतीस कारणीभूत असणारे बांधकाम ठेकेदार रेहान अन्सारी, शौचालय परिचालक संदिप जोगू व मनपाचे बांधकाम विभागातील संबधित अभियंता यांच्या विरोधात जखमी मरियमबानोचे वडील सलीम इस्तेखार महरूम शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद केला असुन या तक्रारीने पालिकेचे अधिकारी अडचणीत आले आहेत.