माघार न घेतल्यास घोडेबाजार निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:16 AM2020-02-27T00:16:53+5:302020-02-27T00:17:08+5:30
आज शेवटची मुदत; राष्ट्रवादी-शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांची निवडणूक येत्या ४ मार्च होऊ घातली आहे. तीत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दोन उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. यात गुरुवारी माघारीच्या दिवशी कुणी अर्ज मागे घेतला गेला नाही, तर मात्र या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांच्या पक्षीय बलानुसार शिवसेनेकडून सात सदस्य परिवहन समितीत जाऊ शकतात, तर राष्ट्रवादीकडून तीन भाजपाकडून दोन सदस्य निवडून जाऊ शकतात. त्यानुसार, शिवसेनेच्या सात सदस्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीकडून चार भाजपतर्फेदोन आणि काँग्रेसनेही एका सदस्याचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. निवडणुकीतील या चुरसीमुळे नगरसेवकांची खरेदी-विक्री करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यात काँग्रेसनेही उमेदवार उतरवल्याने यात आणखीनच भर पडली आहे. त्यातही स्थानिक नेतृत्वाला डावलून वरिष्ठांनी आपल्या मर्जीतील उमेदवार दिल्याने स्थानिक काँग्रेसमध्ये नाराजी आहे. असे असले तरी महाविकास आघाडीचा घटक म्हणून आता त्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर, काँग्रेसला सामावून घेणे शिवसेनेला क्रमप्राप्त झाले आहे.
काँग्रेसला सामावून घेताना शिवसेनेला आपला एक उमेदवार रिंगणातून मागे घ्यावा लागणार आहे. तसेच उपलब्ध संख्याबळाच्या समीकरणानुसार राष्टÑवादीलासुद्धा एक उमेदवार मागे घ्यावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुप्त मतदानामुळे बसू शकतो कुणालाही फटका
भाजप नेत्यांच्या वाट्याच्या दोन जागांसाठीच उमेदवारी दाखल केली असल्याने त्यांच्या या जागा सहज निवडून येऊ शकतात. परंतु, या निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्याने कोणालाही याचा फटका बसू शकतो.
परिणामी, जर गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने माघार घेणार की शिवसेना काँग्रेससाठी आपला उमेदवार मागे घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, उमेदवारी मागे घेतली गेली नाही, तर मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा घोडेबाजार होण्यास वाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.