एकनाथ शिंदेंच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:02 PM2020-08-15T14:02:53+5:302020-08-15T14:03:24+5:30
कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम; जिल्हावासीयांच्या उत्तम सहकार्याने कोरोनावर लवकरच मात करू
ठाणे : कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत.पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
या समारंभास खासदार राजन विचारे,श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार,ठाणे मनपा आयुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हावासियांना संबोधित करतांना पालकमंत्री श्री शिंदे म्हणाले आपण कोरोनशी सगळं बळ, आपली सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी देखील होतोय.... मुंबई, ठाणे, तसेच एमएमआर शहरांमधील गेल्या काही दिवसांमधली आकडेवारी दिलासादायक आहे.
नव्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर, म्हणजे रिकव्हरी रेट वाढतोय, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढतोय, मृत्यूदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय.
जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल, त्यापाठोपाठ नवी मुंबईत वाशी येथे सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये सिडकोच्या माध्यमातून १२०० बेड्सचं रुग्णालय उभं राहिलं.कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भाइंदर, भिवंडी अशा सर्वच शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात कुठे २०० बेड्स, कुठे ७०० बेड्स, कुठे ५०० बेड्स अशा क्षमतेची रुग्णालये उभारण्यात आली.
कोरोनाची तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी लॅब्जना परवानगी देण्यात आली. या बरोबरच सर्व महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी सुसज्ज अशा स्वतःच्या प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष उभारणीही केली.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आला आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ८६ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध झाला आहे असे श्री शिंदे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधीनी दिला कोरोना काळात आर्थिक निधी सर्व लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार निधीतून सुमारे साडेसात कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी उपलब्ध करून दिले आहे. या सर्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत आहेत. १ कोटी ९६ लाख गरजूना अन्न पाकीट वाटप करण्यासाठी हजारो हात पुढे आले. लॉकडाऊनच्या काळात सुमारे १ कोटी ९४ लाख ६० हजार अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले.परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्याचं शिवधनुष्य जिल्हा व पोलिस प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पेललं. ठाणे जिल्ह्यातून विविध राज्यांसाठी सुमारे ८० ट्रेन रवाना झाल्याजिल्ह्यातून सुमारे ५ हजार ७०० बसेसद्वारे श्रमिकांना त्याच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. संचारबंदीच्या पहिल्या दिवसापासून प्रशासनातील प्रत्येक घटक वेळ, काळाचं बंधन न बाळगता सातत्याने जिल्हावासियांच्या सुविधेसाठी कार्यरत होता, याचा मला अभिमान आहे असेही श्री शिंदे यांनी सांगितले.
सर्व कोरोना योद्ध्यांचे समाज आणि देश म्हणून आपण कृतज्ञ राहायला पाहिजे असे सागुन ते म्हणाले,कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अतिशय कडकपणे संचारबंदीची अमलबजावणी करण्यात येत होती. याकाळात आलेल्या सर्व सण व उत्सवांमध्ये माझ्या सर्व जातीधर्माच्या बांधवांनी अतिशय साधेपणाने सण, उत्सव साजरे करून शासनाला सहकार्य केलं. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य सण आहेत.या काळात देखील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून साधेपणाने व सामंजस्याने हे सर्व उत्सव साजरे करावेत, असं आवाहन श्री शिंदे यांनी केले. हा लढा आपल्या संयमाचा आणि जिद्दीचा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो असे ही ते म्हणाले मिशन बिगिन अगेनमुळे निर्बंध शिथिल होत असले तरी संकट टळलेलं नाही... एकीकडे दैनंदिन कामकाज सुरु ठेवणं आवश्यक आहे, तर दुसरीकडे कोरोनापासून लोकांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. जनतेने या सर्व कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोना योद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.