भिवंडीत प्लॅस्टिक मण्यांच्या गोदामास आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:36 AM2018-12-04T05:36:30+5:302018-12-04T05:36:39+5:30
ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कम्पाउंड येथे प्लॅस्टिक मणी, प्लास्टिक दाणे व केमिकलचा साठा असलेल्या बंद गोदामास सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
भिवंडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कम्पाउंड येथे प्लॅस्टिक मणी, प्लास्टिक दाणे व केमिकलचा साठा असलेल्या बंद गोदामास सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला. गोदामाजवळच असलेल्या पेट्रोलपंपाला धोका पोहोचू नये, म्हणू्न अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थ केली. हा पेट्रोलपंप महामार्गालगत असल्याने भिवंडी-ठाणे मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती.
भिवंडी-ठाणे महामार्गावरील रहानाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे बांधकाम करून साठवणूक केलेल्या केमिकलची गोदामे मोठ्या संख्येने आहेत. सोमवारी रिलायन्स पेट्रोलपंपामागे मणीबाई कम्पाउंड येथील मुकेश गुप्ता यांच्या मालकीच्या गोदामास आग लागली. या गोदामात प्लॅस्टिक मणी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, मण्यांना रंग देण्यासाठी लागणारे केमिकल तसेच मोत्यांच्या माळा व इतर साहित्य होते. या बंद गोदामातून अचानक धूर निघू लागल्याने परिसरातील गोदाम कामगारांनी स्थानिक लोकांसह पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मनपाच्या अग्निशमन दलास घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागल्याने गोदामाचे पत्र्यांचे छप्पर कोसळले आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. आगीच्या ज्वाळा पसरू लागल्या. आग विझवण्यासाठी कल्याण, डोंबिवली व ठाण्याच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.