फ्लेमिंगोंना ठाणे खाडीकिनाऱ्याचा मोह आवरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:12 AM2019-04-24T02:12:06+5:302019-04-24T02:12:14+5:30
पक्षिप्रेमींना घेता येणार आनंद, हंगाम संपत आला तरी दर्शनाची संधी
- स्नेहा पावसकर
ठाणे : फ्लेमिंगो सॅन्च्युअरी (अभयारण्य) म्हणून घोषित केलेल्या ठाणे खाडीकिनारी एप्रिल महिन्याचा शेवट आला की, फ्लेमिंगोंची संख्या कमीकमी होत जाते. परंतु, यंदा एप्रिलचा शेवट आला अर्थात हंगाम संपत आला असला, तरीही सुमारे ५० ते ६० हजार फ्लेमिंगो येथे पाहायला मिळत आहेत आणि पक्षिप्रेमींना याचा आनंद लुटता यावा, यासाठी एक फेरीबोटही सुरू केली आहे.
मुंबईतील विविध खाडीकिनारी फ्लेमिंगोंचे दर्शन नोव्हेंबरपासून घडते. त्यातही ठाणे खाडी हे फ्लेमिंगो सॅन्च्युअरी (अभयारण्य) असून येथे त्यांची संख्या अधिक असते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला फ्लेमिंगो यायला सुरुवात होते. ते साधारण एप्रिलचा शेवट आणि मे च्या सुरुवातीपर्यंत येथे असतात. यापैकी २० टक्के फ्लेमिंगो हे स्थायी आहेत. तर, सुमारे ८० टक्के फ्लेमिंगो हे कच्छवरून येथे येतात. तेथे थंडी वाढली की, ते येथे स्थलांतरित होतात आणि थंडी कमी झाली की, पुन्हा परततात. दरवर्षी एप्रिलच्या शेवटी ठाणे खाडीकिनारी साधारण ३०-४० हजार फ्लेमिंगो असतात.
मात्र, यंदा जास्त म्हणजे सुमारे ५०-६० हजार फ्लेमिंगो ठाणे खाडीकिनारी आहेत, असा अंदाज पक्षिअभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एरव्ही शिवडी खाडी परिसरातही फ्लेमिंगो पाहायला मिळतात. मात्र, सध्या तेथे शिवडी-न्हावाशेवा लिंकचे काम सुरू असल्याने तेथील फ्लेमिंगो ठाणे खाडीकिनारी आले असावेत, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे मोठ्या संख्येने असलेले फ्लेमिंगो पक्षिप्रेमींना पाहता यावे, यासाठी भांडुप पंपिंग स्टेशन येथून सुटणाºया बोटीला वनविभागाने परवानगी दिली आहे. १५ सीटर बोट असून गेल्या आठवड्यापासून ती सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे याला पक्षिप्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच आणखी दोन फेरीबोटी सुरू करण्याची शक्यता आहे.