कल्याण तालुक्यातील पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:40 PM2019-08-07T20:40:53+5:302019-08-07T20:41:29+5:30
कल्याण तहसीलदारांचे चाळी तलाठी पंचनाम्यात व्यस्त
उमेश जाधव, टिटवाळा-: कल्याण तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून अनेकांच्या घरात पावसाच्या पूराचे पाणी शिरल्याने हजारो लोकांच्या घरांचे व घालतील सामानाचे नुकसान झाले असून यात मोठ्या प्रमाणात वितरण हानी झाली आहे.
राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. अशा प्रकारचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी सध्या कल्याण तालुक्याच्या पूरग्रस्त भागात पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्यासाठी फिरत आहेत. पुरात बाधीत झालेल्या लोकांशी संपर्क साधून माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. यावेळी बाधित पूरग्रस्तांना कडून रेशन कार्ड व त्यांचे बँक खाते नंबर यांचा पुरावा घेण्यात येत आहे.
कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही आलेल्या पूरात नदीच्या काठावरील बाधित झालेल्या खडवली, जू, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, म्हारळ, वरप, आपटी, मांजर्ली, गेरसे या गावात सध्या शासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे.
हजारो लोकांना या पुराचा बसला असून, त्यामध्ये त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे बुधवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी हा विषय लावून धरला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरात बाधीत झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असतील त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
पूरग्रस्त भागात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे व जाब जवाब घेण्याचे काम शासकीय यंत्रणांनी प्रगतीपथावर सुरू केले आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन बाधीत पूरग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागात कल्याण व मुरबाड तालुक्यातील ४० तलाठी पूरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी फिरत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून आवाहल शासनाला सादर करण्यात येईल, असे कल्याणचे उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले.