बांधकाम क्षेत्राला महापुराचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:44 PM2019-08-25T23:44:48+5:302019-08-25T23:45:10+5:30

बदलापुरात रिकाम्या फ्लॅटची संख्या वाढली : ग्राहक वळताहेत अंबरनाथ, कल्याणकडे

flood hits construction sector in badlapur | बांधकाम क्षेत्राला महापुराचे ग्रहण

बांधकाम क्षेत्राला महापुराचे ग्रहण

Next

पंकज पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : गेल्या चार वर्षांमध्ये बदलापुरातील बांधकाम क्षेत्राला मंदीचा फटका अनेकदा सहन करावा लागला. या मंदीतून सावरण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिक करत असतानाच २७ जुलैच्या महापुराचा जोरदार फटका बसला. पुरामुळे बदलापुरात घर घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मंदी आणि पूर असा दुहेरी फटका बदलापूरच्या बांधकाम क्षेत्राला बसला आहे.


सर्वाधिक वेगाने वाढणाºया लहान शहरांपैकी एक शहर म्हणजे बदलापूर. गेल्या १० वर्षांमध्ये बदलापूरचा विकास झपाट्याने झाला आहे. विकासकांना आता जागादेखील शिल्लक राहिलेली नाही. शहरात १५० हून अधिक नव्या इमारतींची बांधकामे सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू असलेल्या प्रकल्पांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे. शहरात ५०० पेक्षा जास्त फ्लॅटची संख्या असलेल्या प्रकल्पांची संख्या १२ च्या वर आहे. काही प्रकल्पांमध्ये हजारपेक्षा जास्त फ्लॅटचे बांधकाम करण्यात आले आहे. बदलापुरात घरखरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असली, तरी ज्या प्रमाणात घरांची निर्मिती होत आहे, त्या तुलनेत विक्री घटलेली आहे. सध्या २० हजारांहून अधिक फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक प्रकल्पात केवळ १० ते २० टक्के फ्लॅटची विक्री झालेली आहे. नव्याने तयार होणाºया इमारतींची ही अवस्था असल्याने, येऊ घातलेल्या प्रकल्पांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अगदी मोजक्याच प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घरांची विक्री झाली आहे. उर्वरित घरांची विक्री करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांच्या शोधात आहे.


२०१४-१५ मध्ये बदलापुरात २९० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. २०१५-१६ मध्ये २०८ प्रकल्पांना, २०१६-१७ मध्ये २०२ प्रकल्पांना, २०१७-१८ मध्ये २२६ प्रकल्पांना आणि २०१८-१९ मध्ये १८० प्रकल्पांनाच मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पांच्या बांधकाम मंजुरीचा घसरता क्रम पाहता, गेल्या काही वर्षांत प्रकल्पांची संख्या घटलेली दिसत आहे. सर्वसामान्य ग्राहकांची कमतरता भासत असताना काही बांधकाम व्यावसायिकांनी उच्चभ्रू ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करून महागड्या फ्लॅटची निर्मिती केली आहे. मात्र, ते प्रकल्पही पुढे सरकताना दिसत नाहीत. ग्राहकांचा बदलापूरकडे असलेला ओढा, आता काही प्रमाणात कमी झाला आहे.


आधीच बांधकाम क्षेत्रात मंदी असताना, २६ जुलैच्या महापुराने बांधकाम व्यावसायिकांच्या संकटात भर घातली आहे. उल्हास नदीकिनाºयावरील भागातील इमारतींमध्ये पुराचे पाणी गेल्याने आणि त्यातच महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावर गेल्याने बदलापूर हा पूरग्रस्त परिसर असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलापूरकडे येणारा ग्राहक हा आता अंबरनाथ आणि कल्याण भागाकडे वळला आहे. महापुराचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. बदलापूरमधील काही भाग पुरात बुडाला होता. आता त्याचा फटका संपूर्ण शहरास बसत आहे. ज्या भागात पाणी आले नाही आणि येणारही नाही, त्या भागातील घरांच्या विक्रीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पूरग्रस्त भागातील निर्माणाधीन गृहप्रकल्प संकटात : ग्राहकांनी फिरवली पाठ
बदलापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये ४० ते ४५ निर्माणाधीन गृहप्रकल्प आहेत. या इमारतींमध्येही पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे या इमारतींकडे घरखरेदी करणारे ग्राहक ढुंकूनही बघण्यास तयार नाहीत. अशा स्थितीतही बांधकाम व्यावसायिकांनी अद्याप घरांच्या किमती कमी केलेल्या नाहीत. दुसरीकडे, बदलापुरातील पूरग्रस्त भागातील रहिवाशांनी त्यांची राहती घरे विक्रीस काढली आहेत. या घरांची संख्याही मोठी आहे. महापुराचे संकट पुन्हा ओढवू नये, यासाठी या भागातील घरे विकून स्थलांतर करण्याची मानसिकता अनेकांनी केली आहे.

Web Title: flood hits construction sector in badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.