पूरग्रस्तांचे मदत साहित्य तब्बल १४ वर्षांपासून ठाण्यात धूळखात पडून, भाजप नगरसेवकाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:26 AM2019-08-17T02:26:50+5:302019-08-17T02:27:04+5:30
दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु...
ठाणे : दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु, त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्याच नसल्याची बाब शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. २००५ सालीसुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यावेळचे साहित्य दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये गेली १४ वर्षे धूळखात पडून असून त्यापैकी अर्धे साहित्य भंगारात विकल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला.
दिवा, कोपरी, मुंब्रा, कळवा आदींसह शहरातील इतर भागातही पूरस्थिती निर्माण झाली होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीची मदत म्हणून धान्य आणि इतर साहित्याचे किट सर्व्हे करून पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, प्रभाग समितीनिहाय सर्व्हे केला होता. कोपरीतही असा सर्व्हे केला. या भागात १५०० च्या आसपास पूरग्रस्त आढळले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ५०० कुपन आणून १००-१०० याप्रमाणे नगरसेवकांना दिले. या भागातील काही नगरसेवक नवीन असल्याने त्या कुपनच्या मागेच त्यांनी आपले शिक्के मारून ती मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली. मात्र, प्रत्यक्षात १५०० जणांना मदत मिळणे अपेक्षित असताना काही जणांनाच ती मिळाल्याने उर्वरित पूरग्रस्त नाराज झाले असून त्याची उत्तरे आता नगरसेवकांनाच द्यावी लागत आहेत. ही पूरग्रस्तांची चेष्टा असून यामध्ये पालिकेचे अधिकारीच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय, जे खरे पूरग्रस्त होते, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचलीच नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
प्रभारी सभापतींची सारवासारव : २००५ साली पुरामध्ये अनेकांचे नुकसान झाले होते. त्यावेळचे साहित्य आजही दादोजी कोंडदेव क्रीडागृहात धूळखात पडले असल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. काही साहित्य भंगारात विकले जात आहे, तर काही आता इतर ठिकाणी वाटले जात असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली. यावर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजेपर्यंत जागून ही कामे केली असून याबाबत शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे सांगितले. नरेश म्हस्के यांनी पालिकेने आपल्या परिने मदत केल्याचे सांगून सारवासारव केली.