"संजय गांधी उद्यानातून येणारे पावसाचे पाणी अडवून वापरण्यासह, मीरारोड भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:44 PM2021-10-24T19:44:53+5:302021-10-24T19:45:27+5:30
पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते. हे पाणी शहरातून वाहत जाऊन घोडबंदर व जाफरी खाडीस मिळते.
मीरारोड - मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पूर्व भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगर - दऱ्यातून पावसात येणारे पाणी साठवून, त्याचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी अडवले जाऊन शहराला पूरस्थितीपासून दिलासा मिळेल, असे आमदार गीता जैन यांनी म्हटले आहे.
पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते. हे पाणी शहरातून वाहत जाऊन घोडबंदर व जाफरी खाडीस मिळते. परंतू वन हद्दीतून वाहून येणाऱ्या पावसाळी पाण्यामुळे महाजनवाडी, लक्ष्मीबाग, आदी काशीमीरा महामार्गा लगतचा परिसर तसेच हटकेश, सिल्व्हर सरिता, मीरागाव, अमिश पार्क, कृष्णस्थळ, विनय नगर, सिल्व्हर पार्क - विजयंपार्क आदी निवासी क्षेत्राला दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. यामुळे लोकांचे प्रचंड हाल व नुकसान होत असते.
राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारे पावसाचे पाणी वन हद्दीच्या परिसरात साठवून ठेवल्यास त्या पाण्याचा शहरातील नागरिकांसाठी वापर होऊ शकेल व नागरी वस्तीत उद्भवणारी पूरस्थिती नियंत्रणात येईल त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत सर्वेक्षण करून पावसाळी पाणी साठवण्यासाठी ५ ठिकाणे निवडण्यात आली.
परंतु, सदर कामास विलंब होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्याआधी कामे पूर्ण व्हावीत यासाठी आ. जैन यांच्या विनंतीवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली होती. ठाकरे यांनी वन आदी विभागाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थळपाहणी करून तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले होते.
त्यानुसार शुक्रवारी आ. जैन सह राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, महानगरपालिकेचे शहर अभियंता व अधिकारी, नगरसेवक अश्विन कासोदरिया व परशुराम म्हात्रे आदीनी महापालिकेने सुचविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या जागांची पहाणी केली. त्यात वाघेश्वरी मंदिराच्यामागे सर्व्हे क्र. २०६ येथील जागेची निवड करण्यावर एकमत झाले. या जागेचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक विभागाकडे देण्यात यावा असे आ. जैन यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.