कल्याण ग्रामीण भागास पुराचा जोरदार तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:27+5:302021-07-23T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हारळ : कल्याण ग्रामीण परिसराला गुरुवारी पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. वरप-कांबा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हारळ : कल्याण ग्रामीण परिसराला गुरुवारी पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. वरप-कांबा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, त्यात अनेक कुटुंबे अडकून पडली. स्थानिक रहिवासी, एनडीआरएफ व प्रशासनाने या गावांमधून जवळपास १०० जणांना सुरक्षित बाहेर काढले, तर दुसरीकडे रायता पुलावरून उल्हास नदीचे पाणी गेल्याने कल्याण-मुरबाड महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. परिणामी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आणे-भिसोल गावांचाही संपर्क तुटला आहे.
पहाटे ३ वाजल्यापासून पुराचे पाणी कल्याण ग्रामीण भागात शिरल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. अनेक ठिकाणी आदिवासी कुटुंबांना गावातील तरुणांनी सुरक्षितस्थळी हलवले. त्याचबरोबर मोर्यानगर, शर्मा चाळ आदी ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना पंचायत समिती सदस्य भाऊ गोंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षितपणे सेक्रेड हार्ट शाळेत स्थलांतरित केले. तेथेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच विवेक गंभीरराव, महेश देशमुख यांच्या टीमने कल्याण-मुरबाड महामार्गावर दोरखंडाची साखळी बनवून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. एनडीआरएफची टीम दुपारी १२ नंतर ग्रामीण परिसरात दाखल झाली. या टीमने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.
शहाड- मोहने वाहतूक बंद
- शहाड येथे मोहने रोड पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शहाड-मोहने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या. तसेच वखारीमध्ये पाणी शिरले.
- अंबिकानगर येथे अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. शंभरहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याचे कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.
------------------