वाहनावरील ताबा सुटल्याने मैदा वाहक ट्रकची सिमेंटच्या ट्रकला धडक
By जितेंद्र कालेकर | Published: December 3, 2023 06:35 PM2023-12-03T18:35:33+5:302023-12-03T18:35:47+5:30
चालकासह आठ जखमी: नाशिक मुंबई मार्गावरील खारेगावातील घटना.
जितेेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाहनावरील ताबा सुटल्याने १२ टन मैदा वाहून नेणाऱ्या ट्रकची सिमेंट टँकरला जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मैदा वाहक ट्रकचा चालक इजाज अहमद (४०) आणि क्लिनर रशिद अब्दुल (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले. तर अन्य सहा प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये वाहन चालकासह एक प्रवास असे दोघेजण अडकले होते. या दोघांनाही सुखरुप बाहेर काढून त्यांच्यासह सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
खारेगाव टोल नाक्याच्या पुढे खारेगाव ब्रिजजवळ नाशिक - मुंबई मार्गावरुन ३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या चालक इजाज हा १२ टन मैदा मालेगाव ते मुंबई असा घेउन जात होता. त्याचदरम्यान, त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ३२ टन सिमेंट टँकरवर जोरदार आदळला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने मदतकार्य राबविले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये वाहन चालकासह अमर खान (३५ , रा. अंधेरी) हे दाेघेजण अडकले होते. खान आणि इजाज या दाेघांच्याही दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तर क्लिनर रशिद अब्दुल (२६, रा. मालेगाव ) याच्या डोक्याला व पोटाला तसेच डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाल आहे. याशिवाय, मालेगाव ते अंधेरी प्रवास करणारे अमजर खान, अफसना खान (३६, रा. अंधेरी. ) जरीन खान, (७ वर्षे) ही मुलगी किरकोळ जखमी झाली. तर समीर खान ( १२, रा. अंधेरी )
अब्दुल समत (२३, रा. मालेगाव ) आणि आदिल मलिक, ( २७ , रा. अंधेरी ) हे आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातग्रस्त ट्रक मध्ये अडकलेल्या वाहन चालक व प्रवासी यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मागार्वरील या वहिनीवरील वाहतूक एका मार्गिकेवरून वरून धिम्या गतीने सुरू होती.
हे अपघातग्रस्त वाहन क्रेन मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला केले आहे. अपघातामुळे रस्त्यावर आॅइल सांडलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.