फुले नाट्यगृह १ जुलैला सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:55 AM2019-05-29T00:55:53+5:302019-05-29T00:56:00+5:30
सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरू असलेले वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केडीएमसीने निश्चित केले आहे.
डोंबिवली : सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरू असलेले वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केडीएमसीने निश्चित केले आहे. त्यानंतर, चाचणी घेऊन नाट्यगृह सुरू केले जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १ जुलैला नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची दाट शक्यता आहे.
सप्टेंबरपासून फुले कलामंदिर वातानुकूलित यंत्रणेच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात कामाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. मेच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृह सुरू होईल, असा दावा केला जात होता. परंतु, यठिकाणी असलेल्या बेसमेंटमध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीतील मतदानयंत्रे चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली होती. २३ मे या निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत ही मतदानयंत्रे त्याठिकाणी होती. नाट्यगृहाचे बेसमेंट हे नाट्यगृहाच्या मागील बाजूस असल्याने तेथील बंदोबस्ताचा फटका नाट्यगृहात सुरू असलेल्या कामाला बसणार नाही, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात मतमोजणीच्या आधी सुरक्षेच्या कारणास्तव ८ ते १० दिवस त्याठिकाणी कोणालाही फिरकू दिले नाही. पालिका अधिकाऱ्यांनाही नाट्यगृहात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्या कालावधीत काम होऊ शकले नाही, अन्यथा जूनच्या पहिल्या आठवड्यातच वातानुकूलित यंत्रणेची चाचणी घेऊन नाट्यगृह सुरू करता आले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
>अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
वातानुकूलित यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने साधारण जुलै महिन्यापासून नाट्यगृह सुरू होईल, असा अंदाज व्यवस्थापनाकडून बांधण्यात आला आहे. यासाठी जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत दिल्या जाणाºया प्रयोगाच्या तारखांचे अर्ज स्वीकारण्यास व्यवस्थापनाने सुरुवात केली आहे.
>वातानुकूलित यंत्रणेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीला युद्धपातळीवर काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेतली जाईल, याला साधारण १५ जूनपर्यंत कालावधी लागेल. त्यानंतरच नाट्यगृह सुरू होईल. - प्रशांत भागवत, उपअभियंता, विद्युत विभाग केडीएमसी