'महाशिवरात्रीला मंदिर परिसरात फुलविक्रेत्यांना मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:26 AM2021-03-11T00:26:56+5:302021-03-11T00:27:03+5:30

ऑनलाइन सुविधा देण्याचे आवाहन : एकावेळी केवळ ५० भाविकांना घेता येणार दर्शन

'Flower sellers are not allowed in the temple area on Mahashivaratri | 'महाशिवरात्रीला मंदिर परिसरात फुलविक्रेत्यांना मनाई

'महाशिवरात्रीला मंदिर परिसरात फुलविक्रेत्यांना मनाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'महाशिवरात्री उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. यात एका वेळी ५० भाविक दर्शन घेतील, याची दक्षता घेऊन मंदिर परिसरात हार व फुलविक्रेत्यांना मनाई करण्यास सांगितले आहे. तसेच शिवमंदिर व्यवस्थापनाने दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याचे आवाहनदेखील महानगरपालिकेने केले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात पूजाअर्चा केली जाते व दर्शनासाठी अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करीत असतात. परंतु, यावर्षी कोविडच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त ५० भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन होईल, याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी बाहेर न पडता घरीच राहून पूजा करावी असे आवाहन ठामपाच्या वतीने करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणांपुढे चिंता पसरली आहे. 

ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरही राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात यंदा महाशिवरात्री साजरी होणार नाही. मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्याने भाविकांना आत येऊन दर्शन घेण्यास बंदी राहणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी महाशिवरात्री आल्याने ती साजरी झाली होती.
महाशिवरात्रीला भल्या पहाटेपासूनच देशभरातील सर्वच शिवमंदिरात भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात. शहरातील छोट्यामोठ्या शिवमंदिरात हर हर महादेवचा जयघोष ऐकायला मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे महाशिवरात्री साजरी करण्यामध्ये खंड पडणार आहे. भाविकांसाठी मंदिर पूर्णत: बंद असणार असल्याचे येथील पुजारी विनायक गाडे यांनी सांगितले. केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे पहाटेची पूजा होणार आहे. तसेच, मंदिरात फुलांची आरास आणि भोवती रोषणाईने सजावट होणार असल्याचे ते म्हणाले. भाविकांची मात्र निराशा होणार आहे.

कोरोनारुग्ण वाढत असल्याने मंदिरात जाऊन गर्दी करण्यापेक्षा भाविकांनी घरातच महादेवाची पूजा करावी. या दिवशी उपवास धरायला हरकत नाही. 
    - दा.कृ. सोमण, पंचांगकर्ते

Web Title: 'Flower sellers are not allowed in the temple area on Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.