बनावट विदेशी मद्याची कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना शहापूरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 10:14 PM2020-01-21T22:14:10+5:302020-01-21T22:20:15+5:30
एका कारमधून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सलग दोन दिवस पाळत ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने दोघांना मंगळवारी अटक केली. मद्यासह वाहतूकीची कारही या पथकाने त्यांच्याकडून जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने शहापूर येथे धाड टाकून एका वाहनातून बनावट मद्याची वाहतूक करणा-या किशोर सोनावले (२९, रा. शहापूर, ठाणे) आणि गोकूळ शिरोसे (३०, रा. शहापूर) या दोघांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचे १८० मिलीचे ३० बॉक्स आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोटारकार असा आठ लाख १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांनी अवैध मद्य तस्करीविरुद्ध कारवाईचे आदेश ठाण्याच्या कोकण विभागीय भरारी पथकाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर शहापूरच्या लाहे परिसरात २० जानेवारी रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे ए. डी. कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड तसेच जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव आणि सदानंद जाधव आदींच्या पथकाने सापळा लावला होता. अखेर २१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास लाहे भागातून मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाºया किशोर आणि गोकूळ या दोघांना या पथकाने पकडले. त्यांच्याकडून वरील कारसह विदेशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही आरोपींची ठाणे न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.