उमेदवारांचा छुप्या प्रचारावर भर, जबाबदाऱ्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:12 AM2019-04-29T00:12:49+5:302019-04-29T00:13:24+5:30
ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरी उमेदवारांचा खरा प्रचार आता सुरू झाला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरी उमेदवारांचा खरा प्रचार आता सुरू झाला आहे. प्रमुख उमेदवारांच्या पक्षातील मंडळींनी जागता पहारा देत, छुप्या प्रचारावर भर दिला आहे. पक्ष कार्यालयांमध्ये बैठका, खलबतं सुरू आहेत. सोमवारी, मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर कसे काढता येईल, कोणी कोणती जबाबदारी घ्यायची, गाड्यांची व्यवस्था कशी करायची, यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्नही सुरू आहे.
ठाण्यासह कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीनिमित्त मागील १५ दिवस प्रचाराच्या फैरी झडताना दिसल्या आहेत. ठाणे लोकसभेत २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. परंतु, खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होणार आहे. मागील चार ते पाच दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची, तर राष्टÑवादीकडून सुप्रिया सुळे यांचा मेळावा आणि जयंत पाटील, तसेच शरद पवार यांच्या सभा झाल्या. शनिवारी जयंत पाटील यांनी ठाण्यात तळ ठोकून निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. निवडणुकीचा पेपर कशा प्रकारे सोपा करता येईल, यासाठीची चाचपणी पदाधिकाऱ्यांकडून करून घेतल्याचे बोलले जात आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच विचारेंचा विजय अवलंबून असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात त्यांनी रथयात्रा, शनिवारी संपूर्ण ठाण्यात बाइक रॅली काढली होती. शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्याने, भरउन्हात होणारी कार्यकर्त्यांची भटकंती थांबली आहे. मात्र, आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. त्यासाठी ब्लॉक अध्यक्षापासून विभागीय अध्यक्षांपर्यंत सर्वांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पक्ष कार्यालयांमध्ये छुप्या बैठका सुरू आहेत. मतदारांना बाहेर कसे काढले जाईल, आपले मतदार कोणत्या भागात आहेत, कुठे नाहीत, याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व्हेद्वारे अभ्यास केला जात आहे.
निवडणुकीच्या प्रत्येक बुथवर लक्ष ठेवण्यासाठी आणि डोळ्यांत अंजन घालून काम करण्यासाठी जागता पहारा देण्याची तंबीच प्रत्येक बुथ कार्यकर्त्याला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, मतदाराला मतदानकेंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सुविधासुद्धा या मंडळींकडून करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रभागातील पदाधिकाºयांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, मतदान कोणी केले, कोणी नाही, याकडे लक्ष देण्यासाठीही कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदारांनो सहलीवर नका जाऊ!
ठाणे लोकसभा मतदारसंघातील २३ लाख ७० हजार २७६ मतदार आपला कौल कोणाला देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील निवडणुकीत ५०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा त्यात भर पडणार की घट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शनिवार, रविवार आणि मतदानाच्या दिवशी सोमवारी, अशी सलग तीन दिवस सुटी आल्याने आणि पुन्हा एक दिवस कामाचा भरल्यावर १ मे रोजी सुटी असल्याने, अनेकांनी या पाच दिवसांच्या सहलीचे नियोजन केले आहे. अशा मतदारांना रोखण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू आहे.
ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीबाबत काही शंका उपस्थित झाल्यास त्या तत्काळ निवडणूक विभागाला कळवण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी पदाधिकाºयांवर सोपवण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून जाणाऱ्या मतदानाच्या स्लिप घरोघरी पोहोचल्या आहेत किंवा नाही, याचीही चाचपणी केली जात आहे. शनिवारी सायंकाळपासून याबाबत विविध कार्यालयांमध्ये बैठका घेऊन याची वेळोवेळी माहिती घेतली जात असून रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून काम करण्याचा मंत्र पदाधिकाऱ्यांना दिला जात आहे.