मुंबई, दिल्ली पाठोपाठ ठाण्यातही डोळे येण्याची साथ; तीन दिवसात ५९ जणांना लागण
By अजित मांडके | Published: August 4, 2023 03:46 PM2023-08-04T15:46:00+5:302023-08-04T15:50:49+5:30
पावसाळा सुरु झाल्यावर साथरोगांच्या आजारांचे प्रमाण हे ठिकठिकाणी वाढतांना दिसते.
ठाणे : मुंबई, दिल्ली पाठोपाठ आता ठाण्यातही डोळे येणाच्या आजारांनी दस्तक दिली आहे. ठाण्यात मागील तीन दिवसात या आजाराचे ५९ रुग्ण आढळले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर कळवा रुग्णालयातही रोजच्या रोज या आजाराचे रुग्ण येऊ लागल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे येथील डॉक्टरांना देखील डोळे आले होते. परंतु त्या दृष्टीने आता महापालिकेचे आरोग्य विभाग सर्तक झाले असून त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळा सुरु झाल्यावर साथरोगांच्या आजारांचे प्रमाण हे ठिकठिकाणी वाढतांना दिसते. ठाण्यातही या अजारांचे रुग्ण वाढत असतांना आता डोळ्यांची साथ ठाण्यातही आल्याचे दिसत आहे. यापूर्वी मुंबई, दिल्ली तसेच राज्याच्या इतर भागात डोळे येण्याची साथ सुरु झाली होती. तर आता ठाण्यातही ही साथ सुरु झाल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रात मागील तीन दिवसात ३३ रुग्ण आले असल्याची माहिती देण्यात आली. तर कळवा रुग्णालयात तीन दिवसात २६ जण या उपचारासाठी आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान केवळ ठाणेकर नागरीकांनाच नाही तर कळवा रुग्णालयात उपचार करणाºया डॉक्टरांना देखील डोळे आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता ठाणेकरांनी घाबरुन न जाता ही साथ असल्याने त्याचा सामना कसा करावा याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. डोळे आल्यानंतर किमान चार ते सात दिवसापर्यंत त्याचा कालावधी असतो. परंतु या कालावधीत ज्यांना डोळे आले असतील त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, घरी देखील डोळे पुसण्यासाठी वेगळा रुमाल ठेवावा, त्यांनी सतत आपले हात स्वच्छ धुवणे अपेक्षित आहे. तसेच ज्यांना डोळे आले असतील, त्यांच्याशी हस्तांदोलन करु नये, त्यांच्यापासून सहा फुटांचे अंतर किमान ठेवावे अशा काही महत्वाच्या सुचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यातही डोळे आल्यानंतर जवळील आरोग्य केंद्रात जाऊन त्यावरील डोळ्याचे ड्रॉप घ्यावेत असेही सांगण्यात आले आहे. तर महापालिकेकडे पुरेसा औषधा साठा उपलब्ध असल्याचेही महापालिकेने सांगितले.