अन्न, औषध प्रशासन विभागाकडून वर्षभरात १९९ प्रकरणे निकाली
By admin | Published: May 23, 2017 01:40 AM2017-05-23T01:40:14+5:302017-05-23T01:40:14+5:30
मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्या निकाली काढताना, सरकारी तिजोरीत ४५ लाख ६५ हजार रुपये रक्कम दंड म्हणून जमा झाली आहे. त्यातच २६४ तक्रारी न्यायालयात दाखल असून त्यावर तारीख- पे-तारीख पडत असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली.
अस्वच्छतेचे वातावरण, कमी प्रतीचा माल अशा आलेल्या २५७ आणि मागील प्रलंबित ४९६ अशा ७५३ तक्रारींपैकी १९९ तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी मार्गी लावले आहेत. ते मार्गी लावताना दंड आकारला जात आहे. अशा प्रकारे निकाली काढलेल्या तक्रारीपोटी ४५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
यामध्ये एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षातील तक्रारी असून त्यामध्ये आॅगस्ट २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी निकाली काढताना ८ लाख ७० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.
मे आणि डिसेंबर २०१६ हे दोन महिने सोडले, तर इतर महिन्यात लाखोंची दंडात्मक कारवाई केली. तर, ५५४ प्रकरणे प्रलंबित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याचदरम्यान, त्या वर्षात एफडीएने कोकण विभागात ४ हजार ७७९ ठिकाणी तपासणी करून १ हजार १११ ठिकाणी सुधारणा करता येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सुधारणा नोटिसा दिल्या होत्या. त्यातील १४० दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, तपासणीत ५०१ प्रकरणांत १४ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्याचे सूत्रांनी सांगितले.