भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 10:40 PM2022-04-02T22:40:38+5:302022-04-02T22:40:50+5:30
यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील शिरोळे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. उर्वरित सोळा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या शिरोळे गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील पाच विद्यार्थ्यांना २८ मार्च रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात या विद्यार्थ्यांना हलवण्यात आले होते. दरम्यान २९ मार्च रोजी ज्योत्स्ना जयवंत सांबर या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर ३० मार्च ३१ मार्च एक एप्रिल व दोन एप्रिल या सहा दिवसात तब्बल १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्याने या विद्यार्थ्यांवर कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली असून २८ मार्च रोजी काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर काकडी व त्यानंतर प्लास्टिक पिशवीत मिळणारी बर्फाची पेप्सी खाल्ल्यानंतर ५ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब व इतर लक्षणे जाणवू लागली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांपैकी ज्योत्स्ना सांबर या नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या बालरोग तज्ञांची टीम आश्रम शाळेत दाखल होत त्यांनी सदर घटनेची माहिती घेतली असून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार केले त्याचबरोबर शहापूर येथील प्रयोगशाळेत येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते मात्र सदरचे पाणी पिण्या योग्य असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात स्पष्ट झाले आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्रम शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांनी खाल्लेली पेप्सी व अन्नधान्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे यांनी दिली आहे. या घटनेची नोंद पडघा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.