चार तासांच्या व्यापारामुळे अन्नधान्यटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:12+5:302021-04-21T04:40:12+5:30
कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री ...
कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश महापालिका प्रशासन आणि पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कल्याणमधील होलसेल अन्नधान्य व्यापारी वर्गात याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. चार तासांत अन्नधान्याचा व्यापार कसा होणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. अन्यथा कल्याण डोंबिवलीत येत्या काही दिवसांत अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
कल्याणमध्ये झुंझारराव मार्केट आाणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्याची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ५० पेक्षा जास्त व्यापारी अन्नधान्याचा व्यापार करतात. त्या ठिकाणी डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मसाले, तेल आदी माल राज्यासह परराज्यातून येतो. विदर्भातून तांदूळ येतो. मध्य प्रदेशातून गहू येतो. पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रातून तांदूळ येतो. या बाजारात दररोज ३०० टन माल येतो. एका दुकानात चार कर्मचारी काम करतात. त्यामुळे या व्यापारावर शेकडो कुटुंबीयांचे पोटपाणी आहे.
होलसेल मार्केटचे सचिव नरेंद्र परमार यांनी सांगितले की, चार तासांत व्यापार कसा करणार? दिलेली वेळ खूपच कमी आहे. त्याचा लेखी आदेशही प्राप्त झालेला नाही. महापालिकेने त्याविषयी व्यापारी वर्गास मार्गदर्शन करावे. कारण व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यातून - परराज्यातून जो माल येतो ते लोडिंग - अनलोडिंग कधी करणार? सध्या माथाडी कामगार कमी आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी निम्मे माथाडी कामगार गावी गेले आहेत. वेळ वाढवून न दिल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. व्यापारी प्रकाश गोयल यांनी सांगितले की, सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यापार करणे शक्य नाही. त्याचे कारण व्यापार केल्यावर बँकेचे व्यवहार कधी करणार? आलेल्या मालाचा हिशोब चुकता कसा करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ वाढवून दिली पाहिजे. व्यापारी हेमंद देढिया यांनी सांगितले की, माथाडी कामगार कमी असल्याने एका अन्नधान्याच्या गाडीतून माल उतरविण्यासाठीच चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे गाडी खाली कधी करणार? आणि व्यापार कधी करणार, असा प्रश्न आहे. चार तासांऐवजी किमान दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी.
---------------------------