पालिकेच्या फायलींना फुटणार नाहीत पाय
By admin | Published: December 9, 2015 12:42 AM2015-12-09T00:42:53+5:302015-12-09T00:42:53+5:30
फाईल गहाळ होणे, एकाच विभागात फाईल पडून राहणे, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकरवी फाईल या विभागातून त्या विभागात परस्पर हलविणे आदीं गोष्टींना आता चाप
अजित मांडके, ठाणे
फाईल गहाळ होणे, एकाच विभागात फाईल पडून राहणे, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकरवी फाईल या विभागातून त्या विभागात परस्पर हलविणे आदीं गोष्टींना आता चाप बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यापासून निविदा काढणे, एखाद्या विषया संदर्भातील नोंदी घेणे आदी सर्व कामे आॅनलाईन म्हणजेच संगणकाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. महापालिका मुख्यालयासह १० प्रभाग समिती कार्यालये आता संगणकाच्या माध्यमातून एकाच छताखाली जोडली जाणार आहेत. त्यामुळे फाईल गहाळ होणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेतही हा प्रयोग राबविला जाणार आहे.
स्मार्टसिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहरासासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. परंतु आता शहर स्मार्ट करतांना पालिकेचे प्रत्येक कार्यालय, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा संगणकाच्या माध्यमातून स्मार्ट केला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचे काम सुरु करण्यात आले असून या टप्यात मुख्यालयातील सर्व विभाग हे एकाच छताखाली आणले जाणार आहेत. यापूर्वी पालिकेचा सर्व कारभार हा कागदांच्या सहाय्याने केला जात होता. त्यामुळे फाईल गहाळ होणे, महापालिका मुख्यालयात ठेकेदाराच फाईल घेऊन फिरणे, एकाच टेबलावर दिवेंसदिवस फाईल पडून राहणे असे प्रकार घडत होते. परंतु या सर्वांवर आता तोडगा काढण्यात आला असून यातून पालिकेचा कारभार पेपरलेस करुन, अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असलेल्या फाईलींचा पसाराही कमी होणार आहे.