डायघर प्रकल्पात पहिल्यांदाच 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:43 AM2023-10-20T09:43:21+5:302023-10-20T09:43:30+5:30

स्थानिकांचा विरोध कायम : वीज, बायोगॅसची होणार निर्मिती

For the first time, 15 metric tonnes of waste is processed at the Daighar project | डायघर प्रकल्पात पहिल्यांदाच 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

डायघर प्रकल्पात पहिल्यांदाच 15 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील १४ वर्षांहून अधिक काळ कागदावर असलेला डायघर प्रकल्प अखेर प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ घातला आहे. बुधवारी पहिल्यांदा या ठिकाणी १५ मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाणेकरांचा कचऱ्याचा प्रश्न कायमचा सुटण्याची सुखद चिन्हे दिसू लागली आहेत.  

ठाणे महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला एक हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला आणि ४० टक्के सुक्या कचऱ्याचा समावेश आहे.  हा कचरा सुरुवातीला दिवा येथे टाकला जात होता. तेथील स्थानिकांनी विरोध केल्यानंतर भंडार्ली येथे मागील दीड वर्षापासून कचरा टाकला जात आहे; परंतु स्थानिकांनी विरोध केल्याने, अखेर महापालिकेने आपला मोर्चा डायघर येथील कचरा प्रकल्पाकडे वळविला. काही दिवसांपासून येथे सुक्या कचऱ्याच्या माध्यमातून चाचणी घेतली जात होती. 

 कचऱ्यापासून वीजनिर्मिती
या ठिकाणी येणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्यातून सुमारे २० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी साधारणपणे १८ ते २० महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिकेने दिली. या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मशिनरी या जगातील क्रमांक एकच्या मशिनरी असून जर्मनीवरून त्या आणण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प पूर्णपणे बंदिस्त स्वरूपाचा असून १०० बाय ६० मीटरची शेड त्यासाठी उभारण्यात आली आहे. त्यातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 

कंपन्यांना देणार गॅस
वीजनिर्मितीसह पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर बायो सीएनजी गॅसची निर्मिती केली जाणार आहे. हा गॅस इंडियन ऑइल आणि एचपीसीएलला दिला जाणार आहे. या ठिकाणाहून १० मेट्रिक टन बायो सीएनजी गॅस रोज तयार होणार आहे.

रोजगाराची मिळणार संधी
या प्रकल्पामुळे येथे चालक, सुरक्षा रक्षक, कर्मचारी लागणार आहेत. यातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध 
होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

Web Title: For the first time, 15 metric tonnes of waste is processed at the Daighar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.