शिकण्याची इच्छा असूनही बळजबरीने बालविवाह लावला, आई-वडिलांसह माहेर व सासरच्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:47 PM2021-09-22T15:47:41+5:302021-09-22T15:47:58+5:30
आपल्याला शिकायचे आहे, अजून मी लहान आहे असे सांगून देखील घरच्यांनी २९ जून २०२० रोजी तिचे लग्न बळजबरी त्या तरुणाच्या मूळ गावी लावून दिले.
मीरारोड - मुलगी अल्पवयीन असताना तिची शिकण्याची इच्छा दडपून टाकत तिचा बळजबरी बाल विवाह लावून देणाऱ्या आई वाडीलांसह माहेर व सासरची मंडळी, भटजी आणि लग्नातील वऱ्हाडिं वर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीमीरा भागात राहणारी पीडिता ही गेल्या वर्षी १७ वर्षांची होती व ११ वीत शिकत होती. परंतु, गेल्या वर्षी कोरोना संसर्गा मुळे लॉकडाऊन लागले आणि मे २०२० मध्ये तिचे आई, वडील , भाऊ हे तिला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या कोराळ ह्या मूळगावी घेऊन गेले. तेथे त्यांनी तिचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या हुंडेगाव येथील तरुणाशी निश्चित केले.
आपल्याला शिकायचे आहे, अजून मी लहान आहे असे सांगून देखील घरच्यांनी २९ जून २०२० रोजी तिचे लग्न बळजबरी त्या तरुणाच्या मूळ गावी लावून दिले. लग्नानंतर सासरी पती, सासू - सासरे हे तिला घरात कोंडून ठेवायचे, शिवीगाळ करत त्रास द्यायचे म्हणून ती तिच्या आजी आजोबाकडे गेली. जानेवारी २०२१ मध्ये ती आई-वडीलांसह काशीमीरा येथे घरी परत आली. घरचे तिच्यामागे सासरी जाण्यास तगादा लावत होते. जेणेकरून मुलीने चाईल्ड लाईन संस्थेशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्या संस्थेने ३१ ऑगस्ट रोजी काशीमीरा पोलिसात तक्रार अर्ज दिला. मुलीला संस्थेच्या माध्यमातून बोरिवली च्या एका निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी पीडितेच्या फिर्यादी नुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीं मध्ये मुलीचे आई - वडील , पती, सासू - सासरे, मामा, लग्न लावून देणारे भटजी व लग्नास उपस्थित वऱ्हाडी आदींचा समावेश आहे.