खंडणी देण्यास नकार देणाऱ्या मासळी विक्रेत्याच्या मोबाइलची जबरीने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:28+5:302021-03-30T04:24:28+5:30
ठाणे : खंडणी देण्यास नकार देणाऱ्या बदरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाइल आणि काही रोकडची २५ ...
ठाणे : खंडणी देण्यास नकार देणाऱ्या बदरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाइल आणि काही रोकडची २५ ते ३० वयोगटातील दोन लुटारूंनी जबरीने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख हे आझादनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५५ जवळील मोकळ्या जागेत २७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मासळी विक्रीसाठी बसले होते. त्याच वेळी दोघे लुटारू त्या ठिकाणी आले. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हे पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर दोघांनीही त्यांना मारहाण केली. नंतर चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील तीन हजार ४०० रुपये आणि मोबाइल असा सुमारे दहा हजारांचा ऐवज त्यांच्याकडून जबरीने हिसकावला. शेख यांनी याप्रकरणी २८ मार्च रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.