फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साेनसाखळीची जबरी चोरी
By जितेंद्र कालेकर | Published: February 18, 2024 08:04 PM2024-02-18T20:04:11+5:302024-02-18T20:04:21+5:30
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा: आरोपी पसार
ठाणे: सकाळी आपल्या दोन मैत्रिणींसह फेरफटका मारणाऱ्या अश्विनी शेंडे (२८, रा. रामचंद्रनगर, ठाणे) यांच्या गळयातील सोन्याच्या मंगळसूत्रासह सोनसाखळी खेचून दोघांनी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी दिली.
अश्विनी या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रामचंद्रनगर भागातील सिल्व्हर प्लाझा इमारतीच्या समोरील रस्त्याने फेरफटका मारीत होत्या. त्या निनिन नाका ब्रिजखाली चालण्यासाठी जात असतांना रोड क्रमांक ३३ जवळ एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या भामटयाने त्यांच्या गळयातील ३० हजारांचे मंगळसूत्र आणि १५ हजारांची सोनसाखळी असा ४५ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. याप्रकरणी त्यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास सावंत हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.