थायलंडच्या तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या विदेशी दलाल महिलेस अटक; तीन पीडित तरुणींची सुटका
By जितेंद्र कालेकर | Published: June 23, 2024 07:56 PM2024-06-23T19:56:42+5:302024-06-23T19:57:25+5:30
यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या विदेशी दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (एएचटीसी) अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत मुंबई-ठाणे पूर्व द्रूतगती महामार्गालगत सर्व्हिस रोडलगतच्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीसी कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्यासह जमादार श्रद्धा कदम, दीपक वालघुडे, धनंजय मोहिते, देवानंद चव्हाण, हवालदार किशोर पाटील, कॉन्स्टेबल पूनम खरात आणि किरण चांदेकर आदींच्या पथकाने २१ जून २०२४ रोजी सायंकाळी ४:१५ वाजता धाड टाकली. एका बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी केली. त्यावेळी दलाल विदेशी महिलेने त्याठिकाणी थायलंडच्या तीन मुलींना आणले.
एका मुलीसाठी २५ हजारांचा सौदाही दलाल महिलेने यावेळी ठरविला. या मुलींच्या सौद्यानंतर बनावट गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने याठिकाणी सापळा लावून थायलंडच्या दलाल महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून ३० ते ३५ वयाेगटातील थायलंडच्या तीन पीडित महिलांची सुटका केली. दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात कलम अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला बाल सुधारगृहात
बळीत महिलांना मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी मुंबईत कोणाकडे आश्रय घेतला होता? ठाण्यात त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्यांना या कामासाठी विदेशातून मुंबई, ठाण्यात कोणी आणले? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेच्या एचचटीसी विभागाकडून करण्यात येत आहे.