परराष्ट्र नीती अभ्यासक अनय जोगळेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 03:45 PM2019-08-26T15:45:48+5:302019-08-26T15:47:12+5:30

परराष्ट्र नीती या विषयात सतत काहीना काही शिकण्यासारखं आहे, असे अनय जोगळेकर सांगतात.

foreign policy analyst Anay joglekar | परराष्ट्र नीती अभ्यासक अनय जोगळेकर

परराष्ट्र नीती अभ्यासक अनय जोगळेकर

googlenewsNext

परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीती हे शब्द अनेकांसाठी अनोळखी असतात किंवा त्याबाबत जाणून घेण्यास कोणी फार उत्सुक नसते. पण, या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याच क्षेत्रात पुढे करिअर घडवले आहे, ते माजी सरस्वतीयन्स असलेल्या अनय जोगळेकर यांनी. परराष्ट्र नीती या विषयात सतत काहीना काही शिकण्यासारखं आहे, असे ते सांगतात. परराष्ट्र नीतीचा अभ्यास कसा केला, जागतिक पातळीवर घडणाऱ्या विविध घटनांचा परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होतो, प्रभावी परराष्ट्र धोरण कोणते, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

शालेय जीवनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
- १९९५ साली मी दहावी उत्तीर्ण झालो. अगदी ‘पुस्तकी किडा’ नसलो तरी विविध स्पर्धांत भाग घेतला होता. किंबहुना, माझे व्यक्तिमत्त्व या स्पर्धांमुळेच परिपक्व बनले. पुढे वाणिज्य या विषयात पदव्युत्तर झाल्यावर पत्रकारितेची पदवी मिळवली.

परराष्ट्र नीती म्हणजे काय? आणि परराष्ट्र धोरण या विषयाची आवड कशी निर्माण झाली.
- इतर राष्ट्रांशी करावयाच्या व्यवहारांविषयीचे, आपले विचार आणि आचार म्हणजे परराष्ट्र नीती. १९९१ साली एका वाहिनीने इराक-अमेरिका (पहिल्या आखाती) युद्धाचे थेट प्रक्षेपण केले. येथूनच इतर राष्ट्रांविषयी चर्चा करताना परराष्ट्र धोरणाविषयाची आवड निर्माण झाली.

सरकार बदलल्यानंतर परराष्ट्र धोरण बदलते का? आणि बदलते तर कशा प्रकारे?
- नाही. सरकार बदलले तरी परराष्ट्र धोरण मूलत: बदलत नाही. त्यात सातत्य राखले जाते. त्यातील बदल सूक्ष्म तर कधी दृश्यमान असतात.

जागतिक पातळीवर घडणा-या विविध घटनांचा परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होतो?
- उदा. कच्च्या तेलाचे भाव वाढणे किंवा अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध अशा घटनांचे परिणाम त्यात्या देशांपुरते सीमित राहत नाहीत, तर भारतासही त्याची झळ पोहोचते. याचे परिणाम वाढती महागाई, आटलेली परकीय गुंतवणूक किंवा शेअर बाजारातील घसरण अशा स्वरूपात भारतातही जाणवतात. थोडक्यात, जगाच्या एका कोप-यात घडलेल्या घटनेचे परिणाम जगाच्या दुस-या कोप-यातही जागतिकीरणामुळे कळतात.

तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? कोणकोणत्या देशांच्या परराष्ट्र धोरणाचा तुम्ही अभ्यास केला?
- माझे पुस्तक हे विविध वर्तमानपत्रांतून लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. अमेरिका, युरोपिय राष्ट्रे, चीन, जपान, रशिया, आॅस्ट्रेलिया व सार्क राष्ट्रे अशा जवळपास २५ देशांसोबत असलेल्या भारताच्या संबंधांमध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये इंटरनेट, समाजमाध्यम, अनिवासी भारतीय, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकासाचा वापर यांचा हे पुस्तक आढावा घेते.

नुकतीच ३७० आणि ३५ अ ही कलमे काश्मिरातून रद्द झाली. तुमचे त्याबाबत काय मत आहे?
- कलम ३७० आणि ३५ अ ही दोन्ही कलमे भारताने काश्मिरात लागू करण्याचे कारण म्हणजे विलीनीकरण सोपे व्हावे. काश्मिरी भारतीयांसोबत भावनिकदृष्ट्या जोडले जावे, म्हणून निर्माण केले. मात्र, याचा गैरफायदा पाकिस्तानने विविध कुरापती करण्यासाठीच केला. काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक होय आणि सार्वभौमत्वानुसार चीन अथवा पाकचा यातील हस्तक्षेप योग्य नव्हे.

सर्वात प्रभावी परराष्ट्र धोरण कोणत्या देशाचे आहे ?
- राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवून, पैसा आणि मनुष्यबळ इ. संसाधनांचा कार्यक्षमतेने उपयोग करून अनेक देशांनी आपल्या आकार किंवा लोकसंख्येच्या तुलनेत मोठे स्थान निर्माण केले आहे. खरेतर, राष्ट्राचे (कोणत्याही) परराष्ट्र धोरण उत्कृष्ट कधीच नसते. त्यात काही त्रुटी असतात.

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत काय वाटते ?
- भारत ही जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण लोकशाही आणि अर्थव्यवस्था होय. भारताची प्रगती पाहता भारतास दुर्लक्षित करणे इतर राष्ट्रांस परवडण्यासारखे नाही. मोदी सरकारने परराष्ट्र धोरणात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यांची सांगड घातल्याने ते प्रभावी ठरले आहे.

जगात घडणा-या विविध घटनांचा परराष्ट्र धोरणाचा तुम्ही केलेल्या अभ्यासातून काय निष्कर्ष निघतो?
- पूर्वीइतकी परराष्ट्र धोरण ही संकल्पना तितकीशी संकुचित राहिली नाही. केवळ जगातील महत्त्वपूर्ण राष्ट्रांच्या धोरणांवरच लक्ष केंद्रित न केले जाता इतर राष्ट्रांसही महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रांचा सर्वांगीण विकास, समृद्धी, भरभराट करणारे धोरणच पोषक होय.
--------

सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये घडलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. स्वत: सोबतच त्यांनी शाळेचे नाव मोठे केले आहे. अशा माजी विद्यार्थ्यांच्या याच शाळेतील आजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतींचे हे सदर.

मुलाखतकार विद्यार्थी : अजिंक्य चित्रे, वेदांत वडशिंगकर, अनिकेत हेर्लेकर, धैर्यप्रसाद खटाटे. मार्गदर्शक : प्रभाकर जंगले.

Web Title: foreign policy analyst Anay joglekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे