वन विभागाने अडवले पाड्यांचे पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:34 IST2025-02-25T08:34:17+5:302025-02-25T08:34:22+5:30

अजित मांडके  लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ...

Forest department blocked the water of paddy fields | वन विभागाने अडवले पाड्यांचे पाणी 

वन विभागाने अडवले पाड्यांचे पाणी 

अजित मांडके 
लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले. परंतु या कामासाठी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हे पाडे तहानलेले राहणार आहेत. येथील पाणीपुरवठ्याचे काम दोन वर्षांपासून रखडल्याचे जळजळीत वास्तव ‘लोकमत’ने अलीकडेच उघड केले. 

घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगरमाथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’ने उजेडात आणले. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेतली. माजी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात या भागाची तहान भागविण्यासाठी ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर केली होती. केवळ त्याचे कार्यादेश देण्याचे काम शिल्लक होते. 

नेमका अडसर कोणता?
खरा अडसर पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांचा आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित येतो. या भागात काम करता येत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
यापूर्वीही वनविभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला होता. आता पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. परंतु अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी पाड्यांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.  
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, पाणीपुरवठा विभागाने या कामाचे कार्यादेश दिले होते. खालील बाजूस असलेल्या पाड्यांवर काम सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली होती. 

संबंधित ठेकेदाराला कामाचे कार्यादेश दिले. तसेच वनविभागाकडे पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्याकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
विनोद पवार, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

Web Title: Forest department blocked the water of paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.