अंबरनाथ तालुक्यातील वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यास वनविभाग अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:20+5:302021-03-05T04:40:20+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चिखलोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या डोंगरावर वणवा लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, या वणव्यांवर ...
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चिखलोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या डोंगरावर वणवा लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र, या वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात वनविभागाला अपयश येत आहे. बदलापूर कात्रप परिसरात सलग आठवडाभर वणवा लागत असून वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती बारवी डॅम परिसरातील डोंगरावरदेखील आहे.
कात्रप आणि शिरगाव परिसरात असलेल्या डोंगरावर सायंकाळच्या वेळेस वणवा लागत असून ती विझविण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, एवढे करूनदेखील वेळेवर तो विझत नसल्याने त्याचा त्रास होत आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागातदेखील घडत असून बारवी डॅम रोड परिसरातदेखील दररोज वणवा लागत आहे. तर अस्नोली आणि सागाव परिसरातही तो लागत असल्याने या भागातील वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. वणवा विझवण्यासाठी गावपातळीवर समिती गठित केली असली तरी अपुऱ्या यंत्रणेमुळे तो विझविण्यात अडचणी येत आहेत. कात्रप परिसरात तर सलग सात दिवसांपासून दररोज वणवा पेटत आहे. त्याची कल्पना असतानादेखील वनविभागाने या परिसरात कोणतीही सक्षम यंत्रणा उभारलेली नाही. वणवा पेटण्यामागची कारणे शोधण्यापेक्षा तो पेटल्यावर विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
--------------