काशिमीरा येथील जंगलास लागलेल्या आगप्रकरणी वनविभागाने केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 04:20 PM2020-05-25T16:20:32+5:302020-05-25T16:20:42+5:30
सदर आग वन विभागाने आटोक्यात आणली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानसुद्धा मदतीसाठी धावून गेले.
मीरा रोड - काशिमीराच्या माशाचा पाडालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात रविवारी सायंकाळी मोठी आग लागली. सदर आग दोन भागात लागली असल्याचा संशय असून, वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुमारे अडीच तास आग धुमसत होती. सदर आग वन विभागाने आटोक्यात आणली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानसुद्धा मदतीसाठी धावून गेले.
माशाचा पाडाजवळील जंगलात आग भडकल्याची माहिती स्थानिक आदिवासींनी रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना दिल्यानंतर ते आपले सहकारी अमित दाससह जंगलाजवळ पोहोचले. वनविभागाचा टोल फ्री क्रमांकावर प्रतिसाद मिळाला नाही, तर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी येण्यास त्यांना नकार मिळाला. अखेर सदर आग लागल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार व पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांना मिळाली. बोराडे यांनी लागलीच पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रवाना केले. तर पवार यांनी वन विभागाची दोन पथके आग विझवण्यास रवाना केली.
वनविभागाच्या पथकांनी त्यांच्याकडील फायर ब्लोअरच्या सहाय्याने रात्री साडे नऊपर्यंत आग आटोक्यात आणली. सदर आगीमुळे पालापाचोळा, गवत व काही झाडे जळली असून, यात पक्षी व अन्य लहान वन्यजीवांची किती हानी झाली हे कळू शकलेले नाही. सदर आग दोन भागांत लागलेली असल्याने ती लावण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे एक हेक्टर क्षेत्राचे आग लागल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षी देखील या परिसरात अनेक वेळा आगी लागल्या होत्या . समाजकंटक येथे मद्यपान आदी करण्यासाठी जमतात . तसेच या भागात भुमाफियांनी जंगलात तसेच जंगला लगत मोठय़ा प्रमाणात झोपड्या उभारल्या आहेत. त्यावर ठोस कारवाईच होत नाही . शिवाय स्थानिक नगरसेवकांचा देखील वरदहस्त असतो . जंगल नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जांभळे यांनी केला आहे.